अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- नियमानुसार बदल्या होऊनही बदलीच्या ठिकाणी हजर न होता पूर्वीच्याच ठिकाणी काम करणाऱ्या काही ग्रामसेवकांविरोधात नगर पंचायत समितीने दंडात्मक कारवाई करत त्या ग्रामसेवकांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणीचे आदेशही दिले आहेत.
त्यामुळे कारवाई आणि चौकशी टाळण्यासाठी आता त्या ग्रामसेवकांची धडपड सुरू झाली आहे. नगर तालुका पंचायत समिती मध्ये जुलै महिन्यात नियमित बदल्यांची प्रक्रिया पार पडली होती.
त्यामध्ये अकोळनेर, जेऊर आणि निंबळक या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय तर शिंगवे नाईक, शहापूर- केकती, अरणगाव, सारोळा कासार, उक्कडगाव, टाकळी काझी, हातवळन,बाबूर्डी बेंद, बुरुडगाव,
खोसपुरी या ठिकाणी असणारे ग्रामसेवक नियुक्ती च्या ठिकाणी हजर न होता सोयीस्कर गावात काम करत होते. नगर पंचायत समिती ने या सर्व अधिकाऱ्यांना तब्बल ७ नोटीस दिल्या होत्या पण तरीही हे अधिकारी नियुक्ती च्या ठिकाणी हजर होत नव्हते.
पंचायत समिती च्या मासिक सभांमध्ये वेळोवेळी कारवाई चे ठराव झाले पण तरीही या अधिकाऱ्यांनी दाद दिली नव्हती.उलट विविध राजकीय नेत्यांना भेटून पंचायत समितीवर राजकीय दबाब टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अखेर पंचायत समिती ने कठोर भूमिका घेत प्रशासकीय बदली असणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या ३ वेतनवाढी आणि इतर ग्रामसेवकांची १ वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेतला ,त्याच बरोबर प्रशासकीय बदली झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या गावातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचा ठरावही मासिक सभेत घेण्यात आला.
या कडक कारवाईमुळे त्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. आता आर्थिक चौकशी होऊ नये आणि दंडात्मक कारवाई कमी करावी यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे .त्यासाठी पुन्हा राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम