Ahilyanagar News : जिल्हयात मागील वर्षी एकूण ३४३ गावांना टंचाई कालावधीत टँकरने पिण्याचे पाणी पुरवठा सुरु होता. जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन योजनेच्या आराखड्यात १०८ गावे व २३५ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील गावांना टॅंकरने पाणी पुरवठा सुरु होता.
सदर १०८ गावांपैकी आजमीतीस सुमारे ५९ गावांना टँकरमुक्त करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. तसेच मार्च अखेर पर्यंत यात अजून २१ गावांचे टँकरमुक्त करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे नियोजन आहे. यावर्षी एकूण १०८ पैकी ८० गावांचे टँकरमुक्त करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे नियोजन आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरु असलेल्या जल जीवन मिशन योजने अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा परिषद अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम करणेत येत असल्याने सततच्या पिण्याचे पाण्याची टंचाई भासणाऱ्या गावांना शुध्द पाणी पुरवठा उपलब्ध झाला आहे. दरवर्षी साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात जिल्हयातील विविध ग्रामपंचायतींकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी सुरु होते.
तथापि यावर्षी जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या अथक प्रयत्नातून जिल्हयातील कायम पिण्याचे पाण्याची टंचाई भासणा-या ५९ गावांच्या योजनेच्या कामातील काही कामे अद्याप प्रलंबीत असली तरी, योजनेतून पाणी पुरवठा सुरु करण्यात आल्याने टँकरची मागणी आणि टॅंकरमागे फिरायची वण वण थांबण्यात प्रशासनाला यश आले आहे.
सतत टॅंकरग्रस्त असणा-या या गावांना या वर्षी टॅंकर लागणार नाही हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांचे मोठे यश आहे. त्यामूळे शासनाचा टँकरवर होणा-या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. यामध्ये अकोले-१, कर्जत २५, जामखेड १२, नगर-२, नेवासा-१, पाथर्डी-५. पारनेर-७, श्रीगोंदा-१, संगमनेर-४, कोपरगाव-१ गावांचा समावेश आहे.