Ahmednagar News : चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत उपचार न मिळाल्याने एका महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना (दि.३) ऑगस्टला घडली होती. सामाजिक संघटनांनी पाठपुरावा व काळे,
कोल्हे यांच्या मागणीच्या दुहेरी दणक्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करत, या महिलेच्या मृत्यूप्रकरणी चासनळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल खोत यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
तसेच कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि कंत्राटी रुग्णवाहिका चालक यांच्यावर सुद्धा सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तालुक्यातील कारवाडी येथील रेणुका गांगर्डे या महिलेला (दि. ३) ऑगस्ट रोजी पहाटे सहाच्या दरम्यान प्रसुती कळा सुरु झाल्या.
नातेवाईकांनी महिलेला प्रसूतीसाठी चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यावेळी तेथे कोणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे तिला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. तेथे जाण्यासाठी रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण देत रुग्णवाहिका मिळाली नसल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती.
त्यानंतर नातेवाईकांनी तिला धामोरी उपकेंद्रात दाखल केले. त्या ठिकाणी प्रसूतीही झाली. मात्र अति रक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हा सगळा प्रकार उशिरा उघड झाला आणि त्यानंतर समाजसेवी संघटनांनी तक्रारी केल्या.
आमदार आशुतोष काळे व संजीवनी प्रतिष्ठान विवेक कोल्हे यांच्या संजीवनी प्रतिष्ठानने यात लक्ष घालून दोषींना निलंबन करण्याची मागणी केली होती. काळे-कोल्हे यांच्या दुहेरी मागणीमुळे प्रशासनाने याप्रकरणी तातडीने चौकशी केली.
झालेल्या चौकशीत आरोग्य अधिकाऱ्यांवर ठपका ठेवत नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी (दि.९) ऑगस्ट रोजी रात्री वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल खोत यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तर रुग्णवाहिका कंत्राटी चालक आणि कंत्राटी डॉ. साक्षी सेठी यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.
काळे-कोल्हे यांच्या दुहेरी दणक्यानंतर निष्काळजीपणामुळे चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने तालुक्यातील अधिकाऱ्यांचे घाबे दणाणले आहे. अशाच प्रकारे काळे, कोल्हे यांचा दुहेरी दणका सुरू राहिल्यास रस्त्याचे ठेकेदार असो,
पंचायत समिती, नगर पालिका, महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, अधिकारी असो की, कर्मचारी यांच्यावर वचक राहून तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न चुटकीसरशी मार्गी लागतील, अशी चर्चा आता सुरू आहे.