Ahilyanagar News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी, चौंडी (ता. जामखेड) येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक लवकरच पार पडणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली.
या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत अहिल्यादेवी होळकर सृष्टी, संत ज्ञानेश्वर सृष्टी, भुईकोट किल्ल्याचे राज्य सरकारकडे हस्तांतरण आणि संवर्धन, तसेच श्रीगोंद्याच्या पेडगाव किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज स्मारक, जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी मंजुरी, आणि प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे हे प्रस्ताव मांडले जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली.

आज झालेल्या ह्या बैठकीस अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
अहिल्यादेवींच्या जन्मशताब्दीनिमित्त जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये आयटी पार्क स्थापन करणे, एमआयडीसीतील उद्योगांना प्रोत्साहन देणे, यावरही मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे.
याशिवाय, अहिल्यादेवींना वाहिलेले ४५० कोटींचे स्मारक जिल्हा मुख्यालयात व्हावे, यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी नदी खोऱ्यांत वळविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, गोदावरी खोऱ्यात चार नदीजोड प्रकल्प राबवण्याची योजना आहे. चितळे समितीने सुचवलेल्या १२ धरणांच्या ऐवजी ही पर्यायी उपाययोजना राबवली जाणार आहे.