Ahmednagar News : विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य केल्याने भारतीय संविधानाचा अपमान झाला असून, त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भातील खोटेपणा लोकांच्या समोर आला आहे. लोकसभेच्या निवडणूकीत देखील मोठ्या प्रमाणात फेक नॅरेटिव्ह पसरवून दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसची दुतोंडी भूमिका यानिमित्त उघड झाली आहे. अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, परदेशात गेल्यानंतर खासदार राहुल गांधींवर तिथल्या वातावरणाचा परीणाम होतो. त्यातून असे वक्तव्य करण्याचे शहाणपण त्यांना सुचत असल्याचा टोला लगावून परदेशात जावून देशविरोधी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळविण्याची हौस आहे.
पण आपण काय बोलतो, याचे भानही त्यांना राहात नाही. यापुर्वी भारतीय लोकशाहीच्या विरोधातील वक्तव्य असो की, संसदेत त्यांच्याच पक्षाच्या पंतप्रधानांच्या कालावधीतील अध्यादेश फाडण्याची खा. राहुल गांधी यांची भूमिका म्हणजे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करणारीच होती, असा आरोप मंत्री विखे पाटील यांनी केला.
आता थेट आरक्षण रद्द करण्याच्या त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसची दुतोंडी भूमिका उघड झाली आहे. लोकसभा निवडणूकीत फेक नॅरेटिव्ह पसरवून दिशाभूल करणारे चेहरे जनतेला समजले आहेत . खा. राहुल गांधीचे वक्तव्य संविधानाचा अपमान करणारे आणि जनतेचा हक्क, अधिकार हिरावून घेणारे असल्याने त्यांच्या वक्तव्याचा मंत्री विखे पाटील तीव्र निषेध केला.
काँग्रेसने नेहमीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. त्यामुळे राहुल गांधी यांची भाषा आणि काँग्रेसची आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका संविधान बदलाची असल्याचे आता लपून राहीलेले नाही. भारतीय जनता पक्षाने नेहमीच संविधानाचा आदर केला. आरक्षण रद्द होवू देणार नाही, असे मंत्री विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.