ग्रामस्थांनीच पकडून दिली शासकीय धान्याची चोरी ; नगर जिल्ह्यातील घटना

Pragati
Published:

Ahmednagar News : स्वस्त धान्य दुकानातून गोरगरीब रेशनकार्डधारकांना अत्यल्प दारात धान्य वितरित केले जाते. मात्र अनेकजण हा धान्य काळ्या बाजारात विक्री करतात.

नुकतेच नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील स्वस्त धान्य दुकानातील शासकीय धान्याची चोरी ग्रामस्थांनी पकडली. हे धान्य पोलिसांच्या स्वाधीन केले असून, या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, चिलेखनवाडी येथील स्वस्त धान्य दुकानाचा माल टेम्पोमधून काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचा प्रकार गावकऱ्यांच्या लक्ष्यात आला. त्यानंतर त्यांनी याबाबत नेवासा पुरवठा विभाग आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलीस आणि पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी पहिले की, ग्रामस्थांनी एक लाल रंगाची तीन चाकी पियागो अँपेरिक्षा अडवून ठेवली होती.

अँपेरिक्षात प्लॅस्टिकच्या गोणीत गहू व तांदूळ आढळला. ९४०० रुपये किमतीच्या व ४०० किलो वजनाच्या १० गोण्या तांदूळ, ५५०० रुपये किमतीच्या २०० किलो वजनाच्या ५ गोण्या गहू असा १४ हजार ९०० रुपये किंमतीचे स्वस्त धान्य आढळले.

चालकाचे नाव अनिल भीमा मोरे आहे. टेम्पो नेवासा पोलीस ठाण्यात आणण्यात आला. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात पुरवठा निरीक्षक वैशाली शिकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव येथील अनिल भिमा मोरे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे सर्वसामान्य जनता उपाशी राहू नये म्हणून सरकार वेळोवेळी अनेक उपाययोजना करत आहे तर दुसरीकडे गोरगरीब जनतेच्या तोंडातला घास हिरावून घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe