अहिल्यानगर शहरातील नागरिकांची पाणीपट्टी चक्क एवढ्या रूपयांनी वाढली! कसे असणार आहेत नवीन दर वाचा सविस्तर!

Published on -

अहिल्यानगर – महापालिकेने पाणीपट्टीच्या दरात वाढ केलीय. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातील तरतुदीनुसार ही वाढ झाली असून, नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजे आजपासून घरगुती नळ कनेक्शन असणाऱ्यांना आता १५०० ऐवजी २४०० रुपये मोजावे लागणार आहेत.

पण पाणीपट्टी वाढवली तरी नगरकरांना मिळणारं पाणी मात्र वाढलेलं नाही. या करवाढीमुळे लोकांच्या खिशावर ताण पडणार आहे, तर महापालिकेच्या उत्पन्नात ६.१४ कोटींची भर पडणार आहे.

पाणीपट्टी वाढली तरी रोज पाणी मिळणार नाही, असं महापालिकेने स्पष्टच सांगितलंय. सध्या शहरात २०११-१२ पासून दिवसाआड पाणी येतं. महापालिकेच्या पाणी उपशात ३० कोटी लिटरची वाढ झालीय, पण तरीही रोज पाणीपुरवठा होत नाही.

कल्याण रोडच्या काही भागात तर तीन दिवसांनी, काही ठिकाणी पाच ते सहा दिवसांनी पाणी मिळतं. केडगावातही तीन-चार दिवसांनी पाणी येतं. त्यामुळे पाणीपट्टी वाढली तरी पाणी वाढलं नाही म्हणून लोकांमध्ये नाराजी आहे.

शहराच्या उपनगरात लोकवस्ती वाढतेय. केडगाव, कल्याण रोड, सावेडी, बोल्हेगाव, नागापूरसारख्या भागात शहराचा विस्तार झपाट्याने होतोय. गावाकडून शहरात राहायला येणाऱ्यांची संख्याही वाढलीय. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली असून, लोकसंख्येचा विचार करून पाणीवाटप व्हावं, अशी मागणी आहे.

मुळा धरणातून सध्या १०० ते १०५ एमएलडी पाणी उपसलं जातं. शहराच्या सध्याच्या लोकसंख्येला हे पाणी रोज पुरवता येऊ शकतं. पण कोणत्या भागात किती लोक राहतात, तिथे किती पाणी लागतं, किती पाणी सोडलं जातं, याचा काहीच हिशेब महापालिकेकडे नाही. त्यामुळे पाणी वितरणाचं नियोजन अजून तरी झालेलं नाही.

नवीन पाणीपट्टीचे दर असे आहेत:

नळ कनेक्शन | जुना दर | मंजूर वाढ | नवीन दर
अर्धा इंच | १५०० | ९०० | २४००
पाऊण इंच | ३००० | १८०० | ४८००
एक इंच | ६००० | ४००० | १००००

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe