अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पाण्याचे स्वप्न साकार होणार ! विखेंच्या घोषणेनं जिल्ह्यात आनंदाची लाट

Published on -

कोल्हार येथील भगवतीपूर येथे ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, उल्हास खोऱ्यातून ६२ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे मोठे दायित्व आपण स्वीकारले आहे आणि या दिशेने काम सुरू झाले आहे.

हा प्रकल्प ४० हजार कोटी रुपयांचा असून, त्यापैकी ३० हजार कोटी रुपये नाबार्डकडून मिळण्यास तयारी दर्शवली आहे. या प्रकल्पामुळे पुढील पाच वर्षांत म्हणजेच २०२९ पूर्वीच गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्ध होईल आणि भंडारदरा धरणात पाण्याची आवक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनेची जबाबदारी स्वीकारणे हे माजी नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्वप्नपूर्तीचा भाग असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

या सत्कार सोहळ्याला माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अध्यक्षता केली. कार्यक्रमात पांडुरंग गणपत खड़े पाटील, अशोक असावा, राजेंद्र कुंकूलोळ, भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ खड़े, चंद्रभान खर्डे, संभाजी देवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी यावेळी कौशल्य विकासाच्या महत्त्वावरही भर दिला. त्यांनी सांगितले की, लोणी येथे सुरू करण्यात आलेले कौशल्य विकास केंद्र भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल.

पालकांनी मुलांना कालबाह्य शिक्षण व्यवस्थेतून बाहेर काढून या संधीचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्योगधंदे सुरू झाल्यावर स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य मिळावे, हा या केंद्रामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तसेच लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. मंत्री विखे पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

सूत्रसंचालन गायत्री म्हस्के आणि यमन फुलाटे यांनी केले, तर स्वप्निल निबे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, नितीन कुंकूलोळ, धनंजय दळे, पंढरीनाथ खड़े, श्रीकांत खर्डे, गोरक्ष खर्डे आणि डॉ. श्रीकांत बेद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रकल्पामुळे अहिल्यानगर आणि परिसरातील पाणीटंचाई दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. मंत्री विखे पाटील यांनी भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. गोदावरी खोऱ्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यावर त्यांचा भर आहे.

त्यांच्या या घोषणेने स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील पाच वर्षांत या भागातील पाण्याचे स्वप्न साकार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe