Ahmednagar News:बोअरवेल मधील पंप काढत असताना कप्पीचा रॉड तुटून डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या युवकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे घडली. गणेश तुकाराम धस असे या दुर्घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणेश धस हा स्वतःचा शेती व्यवसाय करत होता.
त्याचबरोबर गेल्या दोन वर्षापासून तो बोअरवेलमधील मोटार काढण्याचे मदतीस म्हणून काम करत होता. काल बोअर मधील मोटारीचे पाईप काढण्याचे काम चालू असताना एक पाईप निघाला मात्र त्यानंतर आतील मोटार बोअरमध्ये अडकली.
पाईप मशीनच्या साह्याने काढण्याचे काम चालू असताना अचानक एक गट्टू तुटला व तो सरळ खाली उभे असलेल्या गणेशच्या डोक्यावर आदळला.
मोठा रक्तस्राव झाल्याने त्याला प्रथम घारगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून डॉक्टरांनी नगरला नेण्याचा सल्ला दिला, परंतु उपचारापूर्वीच गणेशचा मृत्यू झाला.
गणेशच्या पश्चात त्याचे वृद्ध आईवडील, पत्नी व दोन मुले आणि एक भाऊ असा परिवार आहे. वडील मणक्याच्या आजाराने ग्रस्त असून, ज्यांना कसल्याही प्रकारची हालचाल करता येत नसल्याने घरातील कर्ता पुरुष गेल्याने या सर्वांचा आधार तुटला आहे. मुलांचे शिक्षण व घराची परिस्थिती पाहण्याकरता सध्या घरी कोणी नाही. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.