Ahmednagar news : अडीच लाख रुपये देऊन एक मुलीसोबत मुलाचे मंदिरात लग्नही लावले. नोटरी करण्यासाठी कोर्टात आले असता, यावेळी नजर चुकवत पळून जाणाऱ्या सुनेचे सासूने केस धरून गाडीबाहेर ओढले. यावेळी इतरांनी तिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली मात्र सासूच्या या धाडसामुळे तब्बल १० जणांना फसवणारी टोळी सापडली आहे.
सध्या मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे अनेक उपवर मुलांचे लग्न जमणे अडचणीचे झाले आहे. वय होऊनही अनेक तरुण अविवाहित आहेत. यातही आता एजंट सिस्टीम आली आहे. मुलाचे लग्न जमवण्यासाठी या एजन्टची मदत घेतात. लाखो रुपये मोजून नवरी मुलगी शोधली जाते.मात्र पैसे देऊनही लग्न झाल्यानंतर या मुली पळून जात असल्याने अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे. अशीच घटना श्रीगोंदा न्यायालयासमोर घडली.
श्रीगोंदा तालुक्यातील मुंगसगाव येथील तरुणाचे एका एजंटला अडीच लाख रुपये देऊन तीन दिवसांपूर्वी एका मंदिरात लग्न झाले. दोन्हीकडील लोकांना अडचण नको म्हणून नोटरी करून घेण्यासाठी नवरी, तिची आई आणि नवरदेव व त्यांच्या घरचे श्रीगोंद्यात आले. नोटरी करण्यासाठी मुलाचे वडील आणि मुलगा वकीलाच्या कार्यालयात गेले होते.
नवरी आणि तिची आई आम्ही जरा जाऊन येतो, असे नवरदेवाच्या आईला म्हणाले. त्यानंतर त्या दोघी रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनात जाऊन बसल्या. संशय आल्यामुळे मुलाची आई गाडीजवळ गेली असता गाडी सुरु होऊन नवरी पळून जात होती. मुलाच्या आईने तिच्या केसाला धरून गाडीबाहेर ओढले.
त्याचवेळी गाडीत बसलेल्या मुलीच्या आईने आपल्याजवळील बॅगमधून मिरची पावडर काढून मुलाच्या आईच्या डोळ्यात टाकली. आरडाओरडा झाल्यामुळे लोक तेथे आले. गाडीसह गाडीतील दोघांना लोकांनी पकडले. एक पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीना ताब्यात घेतले.
या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सिमरन गौतम पाटील, आशा गौतम पाटील, सचिन जाधव (सर्व रा. चोरंबाम्हाडा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ), शाहरूख शेख व दीपक देशमुख यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान मुंगुसवाडी येथील मुलाशी लग्न करणाऱ्या सिमरन पाटील हिने याआधी वेगवेगळ्या ठिकाणी नऊ लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. तिच्याकडे बनावट १० आधारकार्ड सापडले आहेत. तिने अनेक बनावट नावे धारण करून ही मुलगी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांशी संपर्क करते, त्यांना लग्नाचे आमिष दाखवून अथवा थेट त्यांच्याशी लग्न करून फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. ही मुलगी आणि तिच्या आईने व साथीदारांनी आणखी किती जणांची फसवणूक केली याचा पोलिस शोध घेत आहेत.