जनतेला गुलाम बनविण्याचे काम येथील नेतृत्वाने केलेले आहे. आपल्याला ती गुलामगिरी संपवायची – आमदार बाळासाहेब थोरात

Published on -

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील जनतेला गुलामगिरीत ढकलणाऱ्यांच्या विरोधात आपली लढाई आहे. पैसा आणि दहशतीचा वापर करून येथील जनतेला वर्षानुवर्ष गुलामीत टाकणाऱ्यांना जनतेची ताकद दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. जनतेपर्यंत जा, त्यांच्यात जागृती करा. ही लढाई आपल्याला जनतेला सोबत घेऊनच लढायची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

राहाता तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी आमदार थोरात बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महासचिव उत्कर्षा रूपवते, ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर, तालुकाध्यक्ष अॅड. पंकज लोंढे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी शिर्डी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी सचिन चौगुले यांच्या निवडीची घोषणा केली. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन चौगुले यांचा सत्कार करण्यात आले.

आमदार थोरात म्हणाले, मी राहात्यात येतो ते चांगले करण्यासाठी. जनतेच्या मनात येथे बदल घडावा, अशी सुप्त इच्छा आहे. बाजार समितीची निवडणूक असो किंवा गणेश कारखान्याची निवडणूक जनतेने आपली भावना मुक्तपणे बोलून दाखवली आहे.

हत्ती कितीही मोठा असला तरीही मुंगी त्याला नाचवू शकते, पराभूत करू शकते हे कोणीही विसरू नये. वर्षानुवर्ष धाक दाखवून या तालुक्यातील जनतेला गुलाम बनविण्याचे काम येथील नेतृत्वाने केलेले आहे. आपल्याला ती गुलामगिरी संपवायची आहे.

साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी बांधलेली दर्शन रांग खुली करावी ही विनंती मी यापूर्वीही केली होती. मात्र पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करायचे असे आम्हास कळाले. आम्ही तेव्हाच सांगितलं होतं, तुम्हाला उद्घाटन कधी करायचं तेव्हा करा, पण ती दर्शन रांग खुली करून द्या.

आता ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर यांनी शासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या १४ तारखेपर्यंत दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण करा, पिंपळवाडी रोड खुला करा, आदी मागण्यासाठी ते प्राणांतिक उपोषण करणार आहे.

आपण देखील या संदर्भात मुख्यमंत्र्याशी तातडीने पत्र व्यवहार करून संवाद करतो. जनतेच्या आणि भाविकांच्या हिताचे विषय, असे उद्घाटनाच्या हट्टपायी रखडून राहू नये, अशी आमची अपेक्षा आहे. यावेळी नागवडे, डॉ. गोंदकर यांचे भाषण झाली. तसेच तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पंकज लोंढे यांनी जनसंवाद यात्रेचा आढावा दिला.

भाविकांच्या असुविधेचा प्रश्न विधानसभेत मांडणार

दर्शन रांगेचे काम होऊन काही महिने उलटलेले आहे. शैक्षणिक संकुल ही तयार आहे. या सर्व सुविधाचे वेळेत लोकार्पण झाले. तर भाविकांनाच त्याचा फायदा होईल, मात्र केवळ उद्घाटनाच्या हट्टापायी त्या सुविधा खुल्या केल्या जात नाही.

ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर यांनी सुद्धा या संदर्भाने शासनाला प्राणांतिक उपोषणाचा इशारा दिला आहे. मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परिसराची भावना कळवणार आहे. याशिवाय विधानसभेत सुद्धा, हे विषय मी आग्रहाने मांडेल, असे आमदार थोरात यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe