‘निळवंडे ‘च्या कामाला कर्डिले यांच्या काळातच गती मिळाली

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात तांभेरे येथे २०१९ मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत इतिहासात प्रथमच निळवंडे धरण कालव्यांच्या कामाचे ‘टेल टू हेड’ असे काम करण्यात आले.

याचे श्रेय माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे असून त्यांच्या आमदारकीच्या काळातच निळवंडेच्या कामाला गती मिळाली, अशी माहिती राहुरी तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष नानासाहेब गागरे यांनी दिली आहे.

गागरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निळवंडे धरणाच्या पाण्याचे लाभधारक शेतकरी गेल्या ४० वर्षांपासून चातकासारखी वाट पाहत होते. १९७८ साली माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला होता;

परंतु अनेक वर्षे झाली परंतु पाणी मिळाले नाही. दरम्यान २००९ ते २०१९ या १० वर्षांत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आमदार होते. सुरुवातीला पाच वर्ष ते विरोधी आमदार होते; परंतु २०१४ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते.

यादरम्यान निळवंडे धरण कालव्यांच्या कामाला खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली. अकोले तालुक्यात काही शेतकऱ्यांनी कालव्यांच्या कामाला विरोध करून काम बंद पाडले होते. त्यावेळी इतिहासात प्रथमच मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत तांभेरे येथे कर्डिले यांनी पुढाकार घेऊन टेल टू हेड काम सुरू केले.

निवडणुका जवळ आल्याने कोण हतबल झाले, हे तालुक्यातील जनतेला माहिती आहे. विरोधकांच्या काळात निळवंडेचा प्रश्न सुटला का ?, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून निळवंडे धरण कालव्यांचे काम पूर्ण होत आहे,

हे सहन होत नसल्याने विरोधक टीका करत असल्याचे नानासाहेब गागरे यांनी म्हटले आहे. २५ वर्षे सत्तेत असताना त्यांना निळवंडे धरण कालव्यांच्या कामाची कोणतीही कळकळ नव्हती; परंतु आता महायुती सरकारच्या काळात कामे होत असल्याने त्यांना मळमळ होण्याचे कारण काय? असेही गागरे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe