अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- महाविकास आघाडी सरकारचे ‘काम कमी जाहिरातबाजी जास्त’, असा प्रकार आहे. सध्या शेतकऱ्यांच्या विजेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून
हा प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास मंत्र्यांना भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिला.

विजेच्या विविध प्रश्नांबाबत राहुरी तालुका भाजपा कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षात जाहिरातबाजी सोडून दुसरे काम झाले नाही.
आपल्या काळातील मंजूर कामे दोन वर्ष झाले, तरी तसेच आहेत. राहुरी नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना, ब्राम्हणी व इतर पाच गावांची पाणीपुरवठा योजना श्रेय घेण्यासाठी स्थगित केली.
सध्या शेतकरी अडचणीत आहेत. महावितरणने शेतकऱ्यांचे रोहित्रे बंद करण्याचे चुकीचे धोरण हाती घेतले आहे. थकबाकी वसुलीबाबत देखील राहुरीतील शेतकऱ्यांकडून जास्त भरणा करून घेतला जात आहे.
ऊर्जा राज्यमंत्र्यांनी राहुरीसाठी वेगळा कायदा लागू केला आहे का?, विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात बीडच्या पाण्याचा खोटा अपप्रचार केला. हा आरोप सिद्ध करून दाखवावा.
जनता दरबार भरवून नागरिकांची फसवणूक करू नये. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण त्यांच्या मागे उभे राहणार असून गुन्हा दाखल होऊन जेलमध्ये जाण्याची आपली तयारी आहे. असे सांगत सदर प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम