Ahmednagar News : तरुणाला मारले, पुरावा संपवण्यासाठी दगडात पुरला मृतदेह .. पोलिसांनी २४ तासात लावला छडा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. खुनासारख्या घटना वाढणे हे देखील चिंतेचे बाब झाली आहे. आता आणखी एक खूनप्रकरण समोर आले आहे.

कर्जत येथे तरुणाचा खून करुन जवळा (ता. जामखेड) येथे दगडाखाली त्याचा मृतदेह पुरण्यात आला. महेश उर्फ दहिष्या नर्गीषा काळे (वय ३०, रा. राजीव गांधीनगर, कर्जत) असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी पसार झाला आहे.

याबाबत नितीन नर्गिशा काळे (वय ४०) यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की १८ एप्रिल रोजी पहाटे चार वाजेदरम्यान आरोपी तुषार उर्फ तलाश शिवा काळे, अश्विनी शिवा काळे व गौरी तुषार काळे (सर्व रा. राजीव गांधीनगर झोपडपट्टी) यांनी भाऊ महेश काळे याचे मोटारसायकलवरून अपहरण केले होते.

याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी तुषार काळे यास अटक केली. चौकशीदरम्यान त्याने आपण महेश नर्गिशा काळे याला मारहाण करून त्याचा खून केल्याचे सांगितले. तसेच, पुरावा नष्ट करण्यासाठी जवळा (ता. जामखेड) येथे दगडाच्या ढिगाऱ्याखाली त्याचा मृतदेह पुरून ठेवल्याचे सांगितले.

त्यानुसार कर्जत पोलिस आरोपीला घेऊन जवळा येथे गेले. पोलिस निरीक्षक मारुती मुळक, जामखेडचे तहसीलदार गणेश माळी, पंचासमक्ष पुरलेला मृतदेह बाहेर काढला. १९ रोजी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृतदेह आणण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी तलाश उर्फ तुषार शिवा काळे, गौरी तलाश उर्फ तुषार काळे यांना अटक केली असून, अश्विनी शिवा काळे ही फरार झाली आहे. कर्जत पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

न्यायालयाने दोन्ही आरोपींना २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. फरार आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना केल्याचे सांगण्यात आले. या घटनेने कर्जत व जामखेडमध्ये खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe