…तर आ.संग्राम जगताप जबाबदार ! शिर्डीच्या त्या प्रकरणावर समोर आली महत्वाची अपडेट

Tejas B Shelar
Published:

शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील समाधी आणि समाधीवर जमा होणारा पैसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आला होता, साईबाबा मंदिरातील इतर समाधीवर जमा होणारा पैसा साई संस्थानच्या तिजोरीत जमा होतो.

मात्र, हाजी अब्दुल बाबा यांच्या समाधीवर जमा होणारा पैसा थेट त्यांच्या वंशजांकडे जात असल्याचा गंभीर आरोप संग्राम जगताप यांनी केला आहे. त्यांच्या मते, हा प्रकार बेकायदेशीर असून ह्या पैश्यांचा ताबा सरकारकडे असायला हवा. संग्राम जगताप यांच्या या वक्तव्याने शिर्डी परिसरातील वातावरण ढवळून निघाले होते.

मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचा तीव्र आक्षेप
दरम्यान या विधानावर मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने तीव्र प्रतिक्रिया नोंदवत संग्राम जगताप यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी जगताप यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप केला आहे. असोसिएशनच्या मते, शिर्डी परिसरातील हा मुद्दा संवेदनशील असून धार्मिक भावनांशी संबंधित आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे शांततामय वातावरण गढूळ होण्याची शक्यता आहे.

वादग्रस्त विधानांद्वारे धार्मिक वाद
पत्रात असेही म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असल्याचा दावा करत असला, तरी पक्षाचे आमदार अशा वादग्रस्त विधानांद्वारे धार्मिक वाद निर्माण करत आहेत. मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनने हा मुद्दा सरकार दरबारी मांडण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आता आणखी गांभीर्य प्राप्त झाले आहे.

पुढे काय होणार ?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सलीम सारंग यांनी संग्राम जगताप यांना आवाहन केले की, स्थानिक नागरिक आणि शिर्डी संस्थान या प्रकरणावर योग्य तो निर्णय घेऊ शकतात. त्यांनी जगताप यांना जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कृतींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर याची जबाबदारी पूर्णतः संग्राम जगताप यांच्यावर असेल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

वादग्रस्त समाधीचा इतिहास
हाजी अब्दुल बाबा हे साईबाबांचे निकटवर्तीय होते. त्यांच्या समाधीचे शिर्डीमधील धार्मिक स्थळ म्हणून महत्त्व आहे. साईबाबांच्या समाधीवर जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन साई संस्थान पाहते. मात्र, हाजी अब्दुल बाबा यांच्या समाधीवरील निधी त्यांच्या वंशजांकडे जात असल्याच्या आरोपामुळे वाद निर्माण झाला आहे.

शिर्डीतील वादावर पुढे काय ?
शिर्डीतील हाजी अब्दुल बाबा दर्ग्याशी संबंधित हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नाही. संग्राम जगताप यांचे वक्तव्य आणि मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचा विरोध यामुळे शिर्डीमधील परिस्थिती कशी मार्गी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe