Ahmednagar News : लग्न झालेल्या शिक्षेकेचे बदलीसाठी जिल्हा परिषदेत भलतेच ‘कांड’ !

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील काही दिवसांपूर्वी ahmednagarlive24 ने काही दिवसांपूर्वी ‘जिल्हा परिषदेत बदलीसाठी घेतायेत खोटे घटस्फोट, बनावट कागदपत्रे..’ अशा आशयाचे एक वृत्त प्रसारित केले होते.

आता जिल्हा परिषदेतील बदलीसाठी शिक्षिकेने केलेलं मोठं ‘कांड’ समोर येण्याची शक्यता आहे. याची सध्या खुमासदार चर्चा सुरु आहे.

जिल्हा परिषदेच्या एका शिक्षिकेने घटस्फोट झाला असल्याने आता येथे राहणे शक्य नाही म्हणून बदली करून घेतली होती. परंतु ज्याच्यासोबत घटस्फोट झाला त्याच शिक्षिकेचा आता त्याच्यासोबत संसार सुखाने सुरू असल्याचे समोर आलेय.

बदलीसाठी घटस्फोटाचा बनाव करणाऱ्या महिला शिक्षिकेची चर्चा सध्या रंगलीय. धक्कादायक बाब म्हणजे कोतवाली पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांकडे पाच वर्षांतील शिक्षक बदलीचे रेकॉर्डच आता मागितले आहे. त्यामुळे या वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

 ते’ सर्व लोक पोलिसांच्या रडारवर

जिल्हा परिषदेत बदलीसाठी काहींनी अपंगत्व नसताना दिव्यांग असल्याचे दाखले दिले तर काही महिलांनी कागदोपत्री घटस्फोट घेतले असे दाखवून इच्छित स्थळी आपली बदली केली व ज्या बरोबर घटस्फोट घेतला त्यासोबत सुखी संसार सुरु असल्याच्या घटना घडताना दिसल्या.

आता शिक्षकांचे हे कारनामे पोलिसांच्या रडारवर आले असून कोतवाली पोलिसांनी झेडपीच्या शिक्षणाधिकार्‍यांकडे पाच वर्षांतील शिक्षक बदलीचे रेकॉर्ड मागितले आहे. आंतर जिल्हा बदलीअंतर्गत २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत बनावट दाखले दिल्याबाबत जिल्हा परिषदेकडे अनेक संस्था व संघटनांनी चौकशीची मागणी केली होती परंतु राजकीय दबावाने ती चौकशी कधी झालीच नाही.

विकास गवळी (राहणार भिस्तबाग, अहमदनगर) यांनी आता पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत तक्रार करत चौकशीची मागणी केली. त्यानंतर आता जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चौकशी सुरू केली असून पाच वर्षांत अशा पद्धतीने आंतरजिल्हा बदलीवरून हजर झालेल्या शिक्षकांच्या नावांची यादी व बदलीचे कारण आदी माहिती मागितली आहे.

परित्यक्तांची चौकशी केली जाणार

अपंगत्व व घटस्फोट प्रकरणात खोटे दाखले देऊन बदल्या केल्या हे असे असतानाच काही महिला शिक्षिकांनी परितक्त्या असल्याचे खोटे दाखले देऊन आपल्या बदल्या करून घेतल्या पण त्या महिला शिक्षिका आजही आपल्या पतीबरोबर राहात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आता परित्यक्तांची चौकशी केली जाणार असून पोलिसांच्या चौकशीत काय पुढे येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe