शिर्डी: प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शिर्डी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. शिर्डीत चार भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूच्या प्रकरणावरून बच्चू कडू यांनी विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना लक्ष्य केले.
टीका करताना कडू यांची जीभ घसरली आणि त्यांनी विखे पाटलांना “मतांचे भिकारी” आणि “खरे भिकार..” असे खरमरीत शब्द वापरले. या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले असून, विखे पाटील यांच्याकडून याला कशा प्रकारे प्रत्युत्तर मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दाही यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.

भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी बच्चू कडूंचा संताप
शिर्डीत चार भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूच्या प्रकरणावरून बच्चू कडू यांनी प्रशासनाला आणि स्थानिक नेतृत्वाला धारेवर धरले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी कडू शिर्डीत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राहाता तहसीलदारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
मृत्यू झालेल्या व्यक्ती भिक्षुक होत्या की भक्त होत्या, याची चौकशी का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तहसीलदारांनी मयतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली नसल्याचा आरोप करत कडू यांनी त्यांना खडेबोल सुनावले. “तहसीलदार तुमची कमाल आहे! श्रीमंत मेल्यावरच भेटायला जाल का? पीडित कुटुंबीयांना भेटा, नाहीतर उचलून न्यावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला. याशिवाय, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचेही त्यांनी जाहीर केले.
राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका
बच्चू कडू यांनी याच मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर घणाघाती हल्ला चढवला. “इथले आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांचे काही कर्तव्य नाही का? प्रशासनाच्या ताब्यात असलेली माणसे मरतात, मग सरकारी कार्यालये कशाला हवीत?
पालकमंत्र्यांनी तहसीलदारांना पीडित कुटुंबीयांची भेट घेण्याचे आदेश द्यायला हवे होते,” असे कडू म्हणाले. यावेळी त्यांनी विखे पाटलांना उद्देशून “ते तर मतांचे भिकारी आहेत. विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुका आल्या की भीक मागतात. खरे भिकार.. तर तेच आहेत,” अशी खालच्या पातळीवरील टीका केली.
कडू यांच्या या टीकेत भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूबाबतचा संताप होता, असे उपस्थितांचे म्हणणे आहे. मात्र, अशा शब्दप्रयोगामुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
प्रशासन आणि राज्यकर्त्यांवरही हल्लाबोल
कडू यांनी केवळ विखे पाटलांपुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण प्रशासन आणि राज्यकर्त्यांवरही हल्ला चढवला. “प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे लोकांचा जीव जातो, तरीही कोणावर गुन्हा दाखल होत नाही. वर्षभर सापाला मारायचं आणि नागपंचमीला त्याची पूजा करायची, अशी अवस्था राज्यकर्त्यांनी मतदारांची केली आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
तहसीलदारांना जर पालकमंत्र्यांनीच कारवाईचा आदेश दिला असता, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता, असेही कडू म्हणाले. त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्थानिक नेतृत्वाने जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली.
बच्चू कडू यांच्या या आक्रमक टीकेमुळे शिर्डीतील राजकीय समीकरणे तापणार आहेत. बच्चू कडू यांच्या या टीकेला विखे पाटील कसे उत्तर हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.