Ahmednagar News : शिर्डी मतदार संघाचे खासदार काल शुक्रवारी कोल्हार खुर्द येथे एका रस्त्याच्या उद्घाटनाला आले परंतु कुणालाही उदघाटनाची माहिती न देता उद्घाटन करून गेले त्यामुळे गावात व परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील कोल्हार खुर्द येथे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी सात्रळ, तांदुळनेर, कोल्हार खुर्द या रस्त्यासाठी निधी दिला असून त्यांच्या निधीतून सदर रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे.
या रस्त्याच्या उद्घाटनासाठी खा. लोखंडे हे कोल्हार खुर्द येथे आले होते. खा. लोखंडे हे कोल्हार खुर्द येथे येणार असल्याचे कोल्हार खुर्द येथील कोणत्याही ग्रामस्थांना अथवा गावातील पदाधिकारी यांना साधी माहिती दिली गेली नाही.
याचे इंगित कोल्हार खुर्दच्या ग्रामस्थांना मात्र उलगडले नाही. या रस्त्याच्या उदघाटनासाठी खा. लोखंडे आले मात्र सोबत गावातील कुणीही समर्थक अथवा सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी याना वगळून बाहेर गावातील लोकांना याठिकाणी बोलावून कार्यक्रम उरकून घेतला
यामध्ये गावाला बाजूला ठेवण्याची भूमिका ठेकेदाराची की खासदार यांच्या कार्यकर्त्यांची याची कोल्हार खुर्द येथे चर्चा सुरू आहे. या ठिकाणी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थक मंडळाची सत्ता असून राज्यातही विखे पाटील व खा. लोखंडे यांच्या पक्षाचे आघाडी सरकार असूनही सरपंच व ग्रामपंचायतला बाजूला का ठेवले अशी चर्चा गावात सुरू आहे.
खासदार आमच्या गावात येऊन परस्पर उद्घाटन करून निघून जातात आणि स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी यांना डावलतात याची तक्रार आम्ही ना. अजित पवार यांचेकडे करणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते अनिल पाटील यांनी सांगितले.
खासदार एक रस्त्याच्या उद्घाटनाला गावात येऊन गुपचूप उद्घाटन करून निघून जातात. गावातील प्रमुख व प्रथम नागरिक असलेल्या महिला सरपंच यांना मुद्दाम या कार्यक्रमाला न बोलावता बाहेरच्या लोकांसोबत कार्यक्रम उरकून घेतात, त्यामुळे खा. लोखंडे यांना गावातील पदाधिकारी व मतदारांशी काही देणेघेणे नसल्याचे आम्हाला वाटते.- अनिता शिरसाठ, सरपंच, कोल्हार खुर्द,