Ahmednagar News : बहुचर्चित नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळाप्रकरणी आता तपासाला गती प्राप्त झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी (२५ जानेवारी) दोन संचालकांना ताब्यात घेतले आहे.अनिल कोठारी व मनेष साठे अशी या दोन संचालकांची नावे आहेत.
उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे इतर संचालकांचे आता धाबे दणाणले आहेत.

दरम्यान माजी संचालिकांचीही चौकशी करण्यात आली. माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणांत फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत याचा तपास सुरू आहे.
बँकेच्या सर्व कर्जप्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिटही झाले असून घोटाळ्याचा आकडा २९१ कोटींवर गेलेला आहे. यात २३ आजी-माजी संचालक, ११ अधिकारी, १९ कर्मचारी इतर२२ जणांसह एका सॉफ्टवेअर कंपनीचर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शाखाधिकारी राजेंद्र लुनिया व शाखाधिकारी प्रदीप या दोघांना अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेने काही अधिकारी कर्मचाऱ्यांना चाकाशीसाठी नोटीस बजावल्या होत्या. त्यातील अनेकांनी अद्यापही चौकशीला प्रतिसाद दिलेला नाही. संचालकांवर कारवाई होत नसल्याने फिर्यादी गांधी यांनी आक्षेप बेतला होता. न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यांना ३० जानेवारी पर्यंत म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने पुढील पावेल उचलली आहेत.
अनेकांचे धाबे दणाणले
फॉरेन्सिक ऑडिट आल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली. सुरुवातीला दोन शाखाधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर आता दोन संचालक ताब्यात घेतले आहे. त्यामुळे इतर संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहेत. एसआयटी स्थापन झाल्याने तपासाला गती मिळाली असून पोलिसांकडून धरपकड सुरू झाल्याने ठेवीदारांना न्याय मिळेल असे वाटू लागले आहे.