Ahmednagar News : शहरात भरदिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेण्याच्या,मोटारसायकल चोरी,घरफोडीच्या घटना वाढत आहेत. मात्र यातील बहुतेक प्रकरणात चोरटे पोलिसांच्या हाती लागत नाहीत. त्यामुळे अशा भुरट्या चोरट्याचे धाडस वाढत असल्याचे समोर आले आहे.
दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील डायमंडचे ७ पेंडल असलेले सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी हिसका मारून तोडून पळवून नेले आहे. सोमवारी (दि.२४) दुपारी १२.३० च्या सुमारास सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवर ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स्वप्नाली राहुल वाळके (वय ३२, रा. ओम साई कॉम्प्लेक्स, काकासाहेब म्हस्के कॉलेज रोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी वाळके या त्यांच्या लहान मुलाला शाळेतून घेवून दुपारी १२.३० च्या सुमारास गुलमोहर रोड कडून प्रोफेसर कॉलनी चौकाकडे त्याच्या मोपेडवर चाललेल्या होत्या.
त्यावेळी त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या मोटारसायकल वर २ अनोळखी इसम आले. त्यांनी मोटारसायकल फिर्यादी वाळके यांच्या जवळ आणली आणि मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून तोडले. काही क्षणातच दोघेही भरधाव वेगात तेथून पसार झाले.
फिर्यादी वाळके यांनी आरडाओरडा केला. मात्र परिसरातील नागरिक जमा होई पर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते. त्यानंतर वाळके यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.सध्या सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. अनेक मुलांची पालकच शाळेत ने आन करतात. यात जास्त करून महिला अधिक असतात, त्यामुळे हे भुरटे चोरटे नेमके शाळा सुटण्याच्या वेळीच चोरी करतात.