Ahmednagar News : कधी कधी माणुसकी किती अंगलट येऊ शकते, अनोळखींना लिफ्ट देणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय अहमदनगरमधील एका व्यक्तीला आलाय. रात्री आपल्या कार मधून लिफ्ट देणं त्याच्या जीवावर बेतलं आहे.
गाडीची लिफ्ट दिल्यानंतर मागे बसलेल्या माणसाने त्यांच्या डोक्यात हातोडा टाकला, जबर जखमी झाल्यानंतर त्या लोकांनी गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम लांबवली. सचिन पठारे (रा. पिंपळगाव कौडा) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी : सचिन पठारे यांनी आपल्या चारचाकी वाहनातून सुपा येथे त्यांच्या कंपनीच्या मॅनेजरला घरी सोडले. तेथून परतत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना लिफ्ट मागितली. पठारे यांनी या प्रवाशांना लिफ्ट दिली.
ते मागच्या सीटवर बसले होते. यातील एकाने हातोड्याने सचिन पठारे यांच्या डोक्यावर वार केला. यात ते जबर जखमी झाले. त्यानंतर त्या दोघांनी गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन ते पळून गेले. सचिन पठारे यांनी सुपा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी केले जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी एक पथक तयार करून तपासाची सूत्रे हलवली. या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून संबंधित गाडी कोपरगाव दिशेने गेली असल्याचे तपासात समोर आले व याच दरम्यान गुप्त बातमीदारमार्फत पोलीस निरीक्षक आहेर यांना माहिती मिळाली की,
संबंधित आरोपी चोरीचा मुद्देमाल घेऊन कोपरगाव- सिन्नरच्या रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर थांबले आहेत अशी माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई करत शिवम मातादिन गौतम आणि दुर्जन अनारसिंग गौतम याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, संबंधित कार हस्तगत केली.