Ahilyanagar News : कमी काळात अधिक पैसा मिळवण्यासाठी कोण काय करेल, याचा अजिबात नेम नाही. मोकळ्या दुधाच्या टॅंकरमध्ये कशा प्रकारे अवैध वाहतूक करण्यात आली, हे वारंवार उघडकीस आले. आता तर चोरट्यांनी मोठी शक्कल लढवली आहे. चक्क भंगार साहित्याच्या नावाखाली तांब्याच्या धातूची अवैध वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला.
ही वाहतूक करणारा भलामोठा कंटेनर पकडण्यात आला. कंटेनरसह तब्बल १ कोटी ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरात ही कारवाई १३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा प्रकार उघडकीस आणला. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर कारवाई करत होते.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/4-2.jpg)
या दरम्यान एक कंटेनर बेकायदेशीरपणे तांबे व ॲल्युमिनीअमचा भंगार माल काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने पुणे येथून दिल्लीकडे जात असून, तो सध्या दिल्ली पुना ट्रान्सपोर्ट एजन्सी, एमआयडीसी, अहिल्यानगर येथे थांबलेला आहे, अशी माहिती एलसीबीच्या पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने तेथे नियोजनबद्ध सापळा रचला. सापळ्यात संशयीत कंटेनर आढळून आला.
कंटेनर चालकाकडे कसून चौकशी करण्यात आली. त्याचे नाव शैलेंद्र सोरन सिंह (वय ४५, रा. स्वरूपनगर, नॉर्थ वेस्ट दिल्ली) असे आहे. त्याच्याकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस केली असता तो अर्धवट व दिशाभुल करणारी माहिती देत होता. पथकाने कंटनेरचा दरवाजाचा उघडून पाहणी केली असता त्यामध्ये तांब्याचे पाईप असलेले बंडल, तांब्याचे जुने भांडे, तांब्याची तार, ॲ़ल्युमिनीअमची वेगवेगळया आकाराचे तुकडे असलेला माल मिळून आला.
कंटेनर चालकाकडे मुद्देमालाचे पावतीबाबत विचारपूस केली असता त्याने मुद्देमालाची पावती दाखविली. त्यात मुद्देमालाबाबत बिल्टी व प्रत्यक्षात असलेला मुद्देमाल यामध्ये तफावत आढळून आली. पथकाने कंटनेर चालक शैलेंद्र सोरन सिंह यास ताब्यात घेऊन, ३० लाखांचा कंटनेर, १ कोटी ८ लाख रुपये किमतीचे एकुण १८ हजार किलोग्रॅम वजनाचे तांबे व ॲ़ल्युमिनीअम धातुचे साहित्य असा एकुण १ कोटी ३८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कंटेनर चालकाने ट्रान्सपोर्टचे मालक पुरूषोत्तम तिलकराज अग्रवाल, रा.पुणे (फरार) यांचे सांगणेवरून मालाचे पुरवठादार एच. एस. ट्रेडींग कंपनी, तामिळनाडू यांचेकडील मालापैकी तांब्याचे पाईप असलेले बंडल बब्बु व त्याचा मित्र यांनी वाघोली (जि.पुणे) येथून कंटेनरमध्ये भरून दिला. कंटनेरमधील मुद्देमाल हा दिल्ली येथे गेल्यानंतर माल कोठे पोहच करावयाचा आहे, याबाबत माहिती नंतर सांगणार होते, अशी माहिती सांगीतली. पोलिसांनी कंटनेर चालक, वाहनाचे मालक, मालाचे खरेदीदार व पुरवठादार यांच्या मदतीने तांबे व ॲ़ल्युमिनीअमचा भंगार माल बेकायदेशीरपणे भरून, खोटी व बनावट बिल्टी तयार करून, सदरचा मुद्देमाल काळया बाजारात विक्री करण्याचे हेतुने दिल्ली येथे घेऊन जाणाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.