अहिल्यानगरमध्ये चोर, दरोडेखोर अगदी बेफान सुटले असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर पोलिसांचा वचक नसल्याचे चित्र सध्या नगरमध्ये दिसून येत आहे. आता भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या, चांदीचे दागिने, रोख रक्कम व २ मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे.
बुरूडगाव रोडवर २८ मार्चला ही घटना घडली.
अधिक माहिती अशी : बुरुडगाव रोडवरील नक्षत्र लॉन समोरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या साई आनंद अपार्टमेंटमध्ये २८ मार्चला सकाळी ७.३० ते दुपारी ४ या कालावधीत ही घरफोडी झाली आहे.

या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राजकुमारी अयोध्या शर्मा (वय २७) या राहतात. त्या केटरिंगचे काम करतात. २८ मार्च रोजी त्यांना आनंदधामजवळील केशर गुलाब मंगल कार्यालय येथे केटरिंगचे काम असल्याने त्या त्यांच्या मैत्रिणीसह सकाळी साडेसात वाजता त्यांचा ओपो रेनो कंपनीचा मोबाईल व एक सॅमसंगचा छोटा मोबाईल तसेच गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व एम व्ही एम टी कंपनीचे घड्याळ, पायाची चांदीचे जोडवे, तीन हजार रुपये रोकड अशा ऐवज फ्लॅटमधील प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवला व फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून केटरिंगच्या कामाला गेल्या.
केटरिंगचे काम करून दुपारी ४ वाजता पुन्हा फ्लॅटमध्ये आल्या.
असता त्यांना फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप तुटलेले दिसले. त्या फ्लॅटमध्ये गेल्या असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले व प्लास्टिकचे बॉक्समध्ये ठेवलेल्या वस्तू दिसून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचा ओप्पो रेनो कंपनीचा मोबाईल, सॅमसंग कंपनीचा मोबाईल, एक तोळा वजनाचे सोन्याच्या पळ्या असलेले मंगळसूत्र, दोन चांदीचे जोड, ३ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी राजकुमारी शर्मा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.