दवाखान्यात गेलेल्या डॉक्टरचे घर चोरटयांनी केले साफ !

Published on -

Ahmednagar News : सध्या ग्रामीण भागासह नगर शहरात भुरट्या चोऱ्या, महिलांच्या पर्समधून पैसे चोरी, गळ्यातील दागिने ओरबाडणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तसेच घरफोड्या देखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे नागरिकांना कामे करावेत की घरांचे राखण करावे असा प्रश्न पडला आहे.

अज्ञात चोरटयांनी  हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर गेलेल्या डॉक्टर दाम्पत्याचे घरफोडून सुमारे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने, १० हजाराची रोख रक्कम असा एकूण १ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

ही घटना सावेडी उपनगरातील मिस्किननगर, गंगादर्शन येथे घडली. याप्रकरणी डॉ. नितीन विठ्ठलराव साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, डॉ. नितीन साळुंके व त्यांच्या पत्नी विदुला साळुंके हे दोघेही शहरातील एका खासगी रुग्णालयात नोकरी करतात. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता हे दोघेही ड्यूटीसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते.

जाताना त्यांनी घराच्या आतील दरवाजाला आतून कडी लावून घेत मेन दरवाजाला कुलूप लावले होते. तसेच मेन गेट देखील ओढून घेतले होते.

घरी कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या खिडकीचे ग्रिल कापले त्यानंतर एक लाकडी शिडी उभी करून घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून १२ ग्रॅमची सोन्याची चेन, एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या चेन, एक तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, तीन ग्रॅमचा ओम, दोन तोळे नऊ ग्रॅमची सोन्याची बांगडी व १० हजाराची रोख रक्कम असा १ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

दरम्यान, डॉ.साळुंके दांपत्य रात्री ११ वाजता घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तोफखाना पोलिसांना याबाबत माहिती दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News