Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील केसापूर, दवणगाव येथील शेतकऱ्यांच्या डाळिंबाची चोरी होऊन लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.केसापूर येथील सरपंच बाबासाहेब पवार यांच्या गट नं ३४ मधील शेतातील तयार होऊन काढणीला आलेले डाळिंब अज्ञात चोरट्याने मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरुन नेले.
पवार यांचे अंदाजे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. दुसऱ्या घटनेत दवणगाव येथील उपसरपंच भरत होन यांच्या शेतातील डाळिंब चोरीस गेले आहे. रात्री बिबट्याच्या भितीने शेतकरी बागाचे राखण करण्यास धजत नसल्याने चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी डाळिंब चोरीचा सपाटा या भागात लावला आहे. या भागात भुरट्या चोऱ्यांचे सत्र चालूच आहे.
शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या डाळिंबाच्या बागेची राखण करावे, असे आवाहन सरपंच बाबासाहेब पवार यांनी केले आहे. कमी पाऊस, वाढती महागाई, रोगराई अशा वाईट प्रसंगी शासनाने व पोलीस खात्यानेसुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे,
तसेच पोलीस प्रशासनाने नदी काठावरील गावांमध्ये गस्त वाढवावी, अशी मागणी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ पवार, दवणगावचे सरपंच मेजर भाऊसाहेब खपके यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे..