अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- ग्रामीण भागात शेतकरी शेतात गेले असता, घरात चोरीचे प्रकार वाढत आहेत. सध्या शेतीतील कामे असल्याने शक्यतो गावात दिवसा कोणीही नसते, केवळ वयोवृद्ध व्यक्ती घरी असतात.
हीच संधी साधून अनेक भुरटे थोडाफार कापूस विक्रीतून शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या दोन पैश्यावर डल्ला मारत आहेत.

यामुळे आता किरकोळ रक्कम देखील घरात ठेवणे कठीण झाले असून सोन्याचे दागिने तर कोणीही घरात ठेवू शकत नाही. इतकी परिस्थिती वाईट झाली आहे.
नुकतीच पाथर्डी तालुक्यातील सोनोशी येथील महेश लक्ष्मण काकडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून एक लाख सात हजार रुपये रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने, असा अडीच लाखाचा ऐवज भर दुपारी लंपास केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शुक्रवारी काकडे व त्यांचे कुटुंब शेतात काम करीत होते. तर मुले शाळेत गेली होती. त्यामुळे घर बंद केलेले होते.
नेमका याच संधीचा चोरट्यांनी फायदा घेत घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लांबविले आहेत. काकडे शेतातून घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी महेश काकडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे कोरोनाचा कहर आणि त्यात आता चोरट्यांची भर पडल्याने सर्वसामान्य हतबल झाले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम