चोरट्यांची अनोखी शक्कल, दुकानांच्या लाईट कट करत एटीएममधले 3० लाख केले लंपास

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : तालुक्‍यातील लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने कापून ३० लाख ६१ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

लोणीव्यंकनाथ येथील हे ए.टी.एम मशीन फोडण्याची ही चौथी वेळ आहे. घटनास्थळास पोलिस उपनिरीक्षक अमित माळी, पोकॉ.व्ही.एम.बडे यांनी भेट दिली. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्‍यातील नगर दौंड महामार्गावरील लोणीव्यंकनाथ येथे भर चौकात असलेले स्टेट बँकेचे एटीएम शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने फोडले.

मशीनमधील ३० लाख ६१ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केल्याचे सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले असल्याचे पोलिसांनी सांगीतले. ही चोरी करण्यासाठी चोरट्यांनी परिसरात असलेल्या दुकानांच्या लाईटचे वीज कनेक्शन कट करत परिसरात अंधार केला.

ही माहिती सकाळी नऊ वाजता बँकेच्या शेजारी व्यवसाय करत असलेले सुहास काकडे हे दुकान उघडल्यानंतर लाईट लागेना म्हणून मीटर पाहिले असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिस पाटील मनेश जगताप यांना खबर देत पोलिसांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती समजताच पोलिस उप निरीक्षक अमित माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील एटी एम मशीन फोडण्याचा या आगोदर तीन वेळा अयशस्वी प्रयत्न झाला होता.

तरी देखील या ठिकाणी बॅक व्यवस्थापनाने येथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा अथवा सुरक्षा रक्षक नेमला नाही. स्टेट बँकेचे एटीएम मशीन नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावर भर चौकात आहे. मागील वेळी तर मशीन उचलून चालविले होते पोलिस गाडीचे सायरन वाजले चोरटे मशीन सोडून पळाले होते.

मात्र या वेळेस चोरटे ३० लाखांची रोकड चोरुन नेण्यात यशस्वी झाले तालुक्यात एटीएम मशीन फोडून रक्‍कम चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, मागील महिन्यात चोरट्यांनी कहर करत मढेवडगाव येथे जिलेटीनचा स्फोट करत एटीएम फोडून रक्‍कम चोरीला गेली होती. तर श्रीगोंदा शहरात देखील अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या असून अद्याप कोणत्याच घटनेतील चोरीचा तपास पोलिसांना करता आला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe