अहिल्यानगर: राज्य सरकारने रेडीरेकनर दरात वाढ केल्यानंतर अहिल्यानगर शहरात मालमत्तांचे दर झपाट्याने वाढले आहेत. यंदा सरासरी ५.४१ टक्क्यांनी वाढ झाल्याने घर, भूखंड, दुकाने आणि कार्यालयांची किंमत चांगलीच वाढणार आहे. परिणामी खरेदीदारांवर आर्थिक बोजा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर महापालिकेच्या हद्दीत कापडबाजार परिसर हा सर्वात महागडा ठरला आहे. तर दुसरीकडे, फराह बाग येथील मोरचुदनगर हा सर्वांत स्वस्त दराचा भाग आहे.

राज्य सरकारने तब्बल तीन वर्षांनंतर रेडीरेकनर दरात वाढ केली असून, ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू झाली आहे. महापालिकेच्या हद्दीत जमिनीच्या दरात ४.८७% आणि सदनिकांच्या (फ्लॅट्स) दरात ८.६७% वाढ झाली आहे. कापडबाजार हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण आणि व्यापारी हब असल्यामुळे या भागातील दर सर्वाधिक आहेत.
या भागात व्यवसाय सुरु करण्याची किंवा घर-दुकान घेण्याची योजना आखणाऱ्यांना आता जास्त खर्च करावा लागणार आहे. याशिवाय नगर परिषद क्षेत्रातही दर वाढले असून, जमिनीचे दर ३.७२% आणि सदनिकांचे दर ९.३०% इतके वाढले आहेत.
प्रभाव क्षेत्रामध्ये म्हणजेच शहराच्या सीमेजवळच्या भागांतही शेतजमिनीचे दर ४.३५%, बिनशेती जमिनीचे दर ९.१३%, तर सदनिकांचे दर सरासरी ७ ते ८% पर्यंत वाढले आहेत.
अहिल्यानगर महापालिकेच्या हद्दीत आता प्रतिचौरस मीटर जमिनीचा किमान दर ६२० रुपये, तर कमाल दर ५६,११० रुपये आहे. फ्लॅट्ससाठी किमान दर २२,४३० रुपये, तर कमाल दर ७७,६८० रुपये इतका आहे.
ग्रामीण भागात शेतजमिनीचा किमान दर २ लाख ४१ हजार रुपये प्रति हेक्टर, तर कमाल दर ११ लाख ४७ हजार रुपये आहे. बिनशेती जमिनीसाठी दर २९० ते १,०२० रुपये प्रतिचौरस मीटर दरम्यान आहेत.
अहिल्यानगर शहरात प्रतिचौरस मीटर जमिनीचा शासकीय दर सध्या ६९० रुपये आहे. म्हणजे एका गुंठ्याची शासकीय किंमत जवळपास ६४ हजार १२६ रुपये इतकी होते. यावर ६ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागते. म्हणजे एक गुंठा खरेदी करताना किमान ३,८४७ रुपये फक्त मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.
खरेदीदरम्यान हे लक्षात घ्या की शासकीय दर हे केवळ कागदोपत्री असतात, प्रत्यक्ष व्यवहारात जमिनीचे दर अनेक पट अधिक असतात. मात्र, मुद्रांक शुल्क हे नेहमी शासकीय दरावरच घेतले जाते.