अहिल्यानगरमधील या म्हैस बाजारामध्ये होते तब्बल २०० कोटींची उलाढाल, बाजाराला ५० वर्षांचा इतिहास

घोडेगावच्या प्रसिद्ध म्हैस बाजाराला ५० वर्षांचा वारसा आहे. या बाजारामध्ये २०० कोटींची उलाढाल होते. कांदा मार्केटमुळे गाव समृद्ध आहे तसेच शेतकरी-व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते.

Published on -

नेवासे- तालुक्यातील घोडेगाव हे देशभरात प्रसिद्ध असलेल्या म्हैस बाजारासाठी ओळखले जाते. तब्बल ५० वर्षांचा इतिहास असलेल्या या बाजारातून दरवर्षी सुमारे २०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. राज्यासह देशभरातील शेतकरी आणि व्यापारी येथे जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी हजेरी लावतात.

म्हैस बाजार

घोडेगावचा म्हैस बाजार दर शुक्रवारी भरतो, आणि महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांतील व्यापारी आणि शेतकरी येथे मोठ्या संख्येने येतात. या बाजारात विक्रीसाठी मुऱ्हा, जाफ्राबादी, महिसाना, पंढरपुरी, मेंढा, गावरान, शिंगाळू, सुरत, नेहसना म्हशींच्या जाती आणल्या जातात. याशिवाय शेळ्या, मेंढ्या, गाई आणि बैलांचाही मोठ्या प्रमाणावर व्यवहार येथे होतो. गुणवत्तापूर्ण आणि जातीवंत जनावरांसाठी घोडेगावचा बाजार देशभरात प्रसिद्ध आहे.

‘बाजाराचे गाव’ ओळख

गेल्या काही वर्षांत घोडेगावच्या कांदा मार्केटनेही मोठी भरारी घेतली आहे. सध्या या मार्केटची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या बाजारामुळे घोडेगावची ओळख आता ‘बाजाराचे गाव’ अशी झाली आहे, असे घोडेगाव बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले. म्हैस बाजार आणि कांदा मार्केट एकत्रितपणे घोडेगावसाठी आर्थिकदृष्ट्या सुवर्णसंधी ठरले आहेत, आणि त्यामुळे गावाची वार्षिक आर्थिक उलाढाल ८०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचते.

उत्तम सोयी सुविधा

घोडेगाव ग्रामपंचायतीने बाजारकरूंसाठी उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सौरऊर्जेवर चालणारा पाणीपुरवठा, आधुनिक आणि चकचकीत अंतर्गत रस्ते, स्वच्छ आणि प्रशस्त स्मशानभूमी, व्यवस्थित आणि मोठे बाजारतळ आहेत.गावच्या अर्थव्यवस्थेला बाजारामुळे मोठी चालना मिळत आहे, रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत आणि व्यापारी व शेतकऱ्यांसाठी उत्तम सुविधा पुरवल्या जात आहेत,” असे सरपंच राजेंद्र देसरडा यांनी सांगितले.

गावाची आर्थिक समृद्धी

घोडेगाव केवळ बाजारासाठी प्रसिद्ध नाही, तर येथील नाट्यसंस्कृती आणि कलावंतांचीही स्वतंत्र ओळख आहे. तसेच ‘घोडेगाव’ नाव शब्द घोडेश्वरी देवीच्या नावावरून पडला असून दरवर्षी उन्हाळ्यात येथे मोठा यात्रोत्सव भरतो. घोडेगावचा म्हैस बाजार आणि कांदा मार्केट यामुळे गावाची आर्थिक समृद्धी झपाट्याने वाढत आहे. भविष्यात हा बाजार आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करू शकतो, असा विश्वास स्थानिक व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe