उत्तरेतील ‘हे’ दुसरे धरण झाले ‘ओव्हरफ्लो’; मुळा नदी झाली वाहती … !

Pragati
Published:

Ahmednagar News : जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनचे जिल्ह्यात आगमन झाले. दक्षिण भागात सर्वत्र दमदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी देखील केली . मात्र जिल्ह्याच्या उत्तर भागात पावसाने पाठ फिरवल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले होते.

तसेच जिल्ह्यातील महत्वाची धरणे देखील याच भागात असल्याने पावसा अभावी धरणात देखील अत्यल्प पाणी शिलक राहिले होते. त्यामुळे या भागात पावसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता या भागात पाऊस सुरु झाला आहे.

अकोले तालुक्यात मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस झाल्याने पिंपळगाव खांड धरण अखेर ओव्हरफ्लो झाले. या धरणातून आता १३९३ क्युसेकने पाणी मुळा धरणाकडे झेपावले आहे.

आंबित पाठोपाठ आता हे दुसरे धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी सुखावला आहे. या भागात झालेल्या संततधार पावसामुळे आदिवासी भागात डोंगरदर्‍या आता ओल्या चिंब झाल्या आहेत. ओढे नाले खळखळून वाहू लागले आहेत. योग्य पाऊस सुरू झाल्याने भात पिकाच्या लागवडी आता सुरू झाल्या आहेत.

मंगळवारी पहाटेपासूनच पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला. बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. पिंपळगाव खांड धरण भरल्याने आता मुळा धरणाकडे पाणी झेपावले आहे. पावसाचा जोर वाढल्यास मुळा धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू होणार आहे.

मुळानदी पाणलोटमध्ये अकोले तालुक्यातील आंबित धरणानंतर आता पिंपळगाव खांड भरले. यंदाच्या पावसाळ्यात अकोले तालुक्यातील हे दुसरे धरण भरले आहे. मुळानदी वाहती झाल्याने संगमनेर, अकोले तालुक्यात आनंद व्यक्त होत आहे.

दरम्यान आतापर्यंत दक्षिण भागात चांगला पाऊस झाला होता मात्र उत्तरेत अद्याप दमदार पाऊस झालेला नव्हता, त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते.

उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी, व्यापार आणि उद्योगांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात पाऊस झाला नसल्याने धरणात देखील पाणीपातळी खालावली होती. मात्र दोन दिवस या भागात चांगला पाऊस झाल्यामुळे भंडारदरा धरणात देखील काही प्रमाणात पाण्याची अवक झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe