अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- ऐन रब्बी हंगामात पेरणी व लागवडी सुरू असताना महावितरण कंपनीने बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे रोहित्र बंद करून वीजपुरवठा खंडित करण्याचे काम जिल्हाभर सुरू केले आहे.
रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडवणूक करून पिकांचे प्रचंड नुकसान करण्याचे काम महावितरण कंपनी करत आहे, असे असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प का? असा सवाल शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी जवरे यांनी केला आहे.
प्रसिद्धीस पत्रकात जवरे यांनी म्हटले, की दोन वर्षांपासून कोरोनात शेतकरी उद्ध्वस्त झाला. गेला खरीप हंगामही अतिपावसामुळे वाया गेला.
एवढ्या ओढा ताणीत शेतकरी रब्बीची पिके उभी करत असताना महावितरण कंपनीने कृषी पंपाची थकीत वीजबिल वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेती पंपांना वीजपुरवठा करणारी रोहित्रे बंद करण्याचा सपाटा लावला आहे.
थकीत वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याआधी वीज कायदा २००३च्या कलम ५६ नुसार ग्राहकाला लेखी आगाऊ नोटीस देणे कायद्याने बंधनकारक असताना,
तसे न्यायालयाचे आदेशही असताना महावितरण कंपनी हे धाब्यावर बसवून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे; परंतु या प्रश्नावर जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी यावर बोलायला तयार नाही.
निवडणुका आल्यानंतर मते मागणारे, शेतकऱ्यांवर आश्वासनांचा पाऊस पाडणारे आता एक शब्दाही उच्चारायला तयार नाही, ही मोठी शोकांतिका आहे.
बेकायदेशीर वागणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात व तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन जवरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम