पारनेर- तालुक्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या कर्जवसुलीत संपूर्ण जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. १०६ संस्थांपैकी १६ संस्थांनी मार्च अखेर १०० टक्के वसुली केली असून, पारनेरने ७५.८५ टक्के एकूण वसुली करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही माहिती जिल्हा बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके आणि संचालक प्रशांत गायकवाड यांनी दिली.
शेतकरी सभासदांसाठी आर्थिक बळ
पारनेर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत गावोगावी शेतकऱ्यांना दरवर्षी ४०२ कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे शेती कर्ज वितरित केले जाते. या कर्जाची वेळेवर वसुली होण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे आणि वसुली अधिकारी रंगनाथ गायकवाड यांनी योजनाबद्ध कृती केली. शाखा भेटी, संचालक व सभासद संवाद, कर्जफेडीबाबत जनजागृती इत्यादी उपक्रम हाती घेण्यात आले.

विशेष सभेतून मार्गदर्शन
ज्या संस्थांमध्ये मागील वर्षी वसुली कमी झाली होती, तेथे विशेष सभा घेऊन सभासदांना कर्जफेडीचे फायदे समजावण्यात आले. यामुळे संचालक आणि सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि नियमित कर्जफेडीस प्राधान्य दिले. या प्रयत्नांमुळे तालुक्यातील अनेक संस्थांनी १०० टक्के वसुली केली आहे.
जिल्हा सहकारी बँकेकडून सन्मान
दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा पारनेर तालुका आर्थिक शिस्तीत मात्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. यंदाही कर्ज वसुलीतील या यशाबद्दल १६ संस्थांचे पदाधिकारी आणि सचिव यांचा जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.
इतर तालुक्यांसाठी आदर्श
जिल्हा सहकारी बँक आणि विविध कार्यकारी सेवा संस्था या शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ देणाऱ्या मातृसंस्था आहेत. अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीत सातत्याने पुढे असून, यामुळे शेतकरी सभासद कर्जमाफीच्या आशेवर न राहता स्वतःहून वेळेत कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतात.
पारनेरच्या या यशस्वी आर्थिक व्यवस्थापनामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यांसाठी एक आदर्श उभा राहिला आहे.