श्रीरामपूर: श्री रेणुका माता मंदिरात पुन्हा एकदा चोरी झाली असून, चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून दानपेटी लंपास केली आहे. विशेष म्हणजे, हे या मंदिरात घडलेले चौथे चोरीचे प्रकरण असून, अद्यापही कोणत्याही चोरीचा तपास लागलेला नाही.
वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, पोलिसांनी त्वरित तपास लावावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

शनिवारी (दि. २९ मार्च) सायंकाळच्या आरतीनंतर मंदिराच्या पुजाऱ्यांनी मंदिर बंद करून कुलूप लावले. मात्र, रविवारी पहाटे पूजा करण्यासाठी आले असता मंदिराचे लोखंडी शटर व लाकडी दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सभामंडपातील दानपेटी गायब होती. याबाबत गावकऱ्यांना कळवण्यात आले आणि त्वरित पोलिसांना माहिती देण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे मध्यरात्री अंदाजे दोनच्या सुमारास मंदिरात प्रवेश करताना आणि दानपेटी घेऊन जाताना स्पष्ट दिसत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे प्रशिक्षार्थी आयपीएस अधिकारी रॉबीन बन्सल, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, उपनिरीक्षक सतीश डोले आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञ, छायाचित्रकार आणि गुन्हे अन्वेषण पथकाने तपास सुरू केला आहे.
गंभीर बाब म्हणजे, याच मंदिरात याआधीही तीन वेळा चोरी झाली असून, अद्याप एकाही प्रकरणाचा तपास लागलेला नाही. त्यामुळे पुन्हा चोरी झाल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.
वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा शोध घ्यावा आणि चोरीस गेलेली दानपेटी परत मिळवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा, भोकर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थ, उपसरपंच संदीप गांधले, सदस्य गिरीष मते, काळू गायकवाड, भाऊराव सुडके, राजेंद्र चौधरी, जगदंबा प्रतिष्ठानचे गणेश छल्लारे आणि रेणुका माता मित्र मंडळीच्या वतीने हा इशारा देण्यात आला आहे.
वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. या चोरीचा तपास कितपत लवकर लागतो आणि चोरटे कधी गजाआड होतात, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.