Ahmednagar News : राज्य शासनाने गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतर दि. ११ जानेवारी ते १० मार्च या पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील ९८ हजारांहून अधिक दूध उत्पादकांना ८२ कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दिली.
राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी दूध उत्पादकांना दोन महिने अनुदान देण्यात आले आहे. या काळात जिल्ह्यातील दूध उत्पादकांना ६७ कोटी १९ लाख ८१ हजार ५५५ रुपयांचे अनुदान दिले आहे. अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
दरम्यान हे अनुदान मिळण्यासाठी जनावरांची भारत पशुधनवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी जनावरांचे इअर टॅगिंग करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे इअर टॅगिंग राहिले आहे, त्या शेतकऱ्यांनी जवळच्या पशुवैद्यकीय चिकित्सा केंद्रात जनावरांना घेऊन जात टॅगिंग करावे.
असे आवाहन देखील पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे इअर टॅगिंग केलेले आहे त्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळेल परंतु जर जनावरांचे इअर टॅगिंग केलेले नसेल त्यांना हे अनुदान मिळणार नाही.
अनुदान योजनेपासून वंचित राहिलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना फाइल अपलोड करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच शासनाने नव्याने जाहीर केलेल्या अनुदानानुसार १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
दूध भुकटीच्या दरात आंतराष्ट्रीय बाजारात घसरण झाली आहे. त्यामुळे दुधाचे भाव गडगडले आहेत. सध्या गायीचे दूध प्रति लिटर २७ ते २८ रुपये दराने खरेदी केले जात आहे. शासनाच्या नवीन आदेशानुसार प्रति लिटर ३० रुपये तसेच ५ रुपये अनुदान असा दर जाहीर केला आहे.
तसेच जिल्ह्याबाहेरील दुधावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांमार्फत जिल्ह्यातील दूध उत्पादकांना १५ कोटी ५९ लाख १७ हजार ८५ रुपयांचे अनुदान दिले आहे.
शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे इअर टॅगिंग राहिले आहे. त्यांनी जवळच्या पशुवैद्यकीय चिकित्सा केंद्रात जनावरांना घेऊन टॅगिंग करावे. त्यामुळे पुढील काळात त्यांना देखील अनुदान मिळेल.