‘त्या’ दोघी मैत्रिणी क्लासला गेल्या मात्र परत आल्या नाहीत ; तीन दिवसात तीन मुली बेपत्ता

Pragati
Published:

Ahmednagar News : नगर शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढत असून अशीच आणखी एक घटना भिंगार शहरात बुधवारी घडली होती.

त्या पाठोपाठ शुक्रवारी दुपारी आणखी २ मुली बेपत्ता झाल्या असून त्यांनाही फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी एक व शुक्रवारी तीन म्हणजे तीन दिवसात तीन मुली बेपत्ता झाल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, भिंगारच्या विजय लाईन चौक परिसरात बुधवारी (दि.१९) सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत घरी एकटीच असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती.

त्या मुलीचा अद्याप शोध लागलेला नसताना शुक्रवारी (दि.२१) दुपारी खळेवाडी परिसरात राहणारी १४ वर्ष ७ महिने वयाची मुलगी आणि सैनिक नगर परिसरात राहणारी तिची १४ वर्ष ३ महिने वयाची तिची मैत्रीण या दोघी बेपत्ता झाल्या आहेत.

त्या दोघी दुपारी १ च्या सुमारास रयतच्या शाळेच्या पाठीमागे क्लासला जातो असे सांगून घराबाहेर पडल्या. त्या पुन्हा घरी परतल्याच नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा भिंगार शहर परिसरात, नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत.

त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निसार शेख हे करीत आहेत. दरम्यान एका पाठोपाठ मुली बेपत्ता झाल्यामुळे पालकांत खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe