Ahmednagar News : आ.बाळासाहेब थोरात व मंत्री विखे पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. एकमेकांवर आघात करण्याची संधी ते दोघेही कधीही सोडत नाहीत. दरम्यान आता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आ. थोरातांनी पुन्हा एकदा विखे यांच्यावर शरसंधान साधले आहे.
अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम पूर्ण केले असून आता ज्यांचे योगदान नाही, ते श्रेय घेण्यासाठी पुढे येऊ लागले असल्याची टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. कुरण-पारेगाव खुर्द-नान्नज दुमाला या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना थोरात यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले संगमनेर तालुक्यात विविध रस्त्यांच्या कामांसह इतरही विकासकामांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा निधी मिळवला होता. मात्र, विद्यमान सरकारने त्या कामांना स्थगिती दिली होती.
ही स्थगिती हायकोर्टातून उठविली आहे. आगामी काळात लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. महाराष्ट्रात झालेला सत्ता बदल हा सामान्य माणसाला आवडला नाही. संपूर्ण राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडे धरणाच्या कालव्यांना मोठा निधी मिळून कामे पूर्ण केली. परंतु उद्घाटनाच्यावेळी ज्यांचे योगदान आहे, त्यापैकी कोणीही नव्हते. श्रेय घेण्यासाठी ही मंडळी धडपड करत आहे.
मात्र, जनतेला खरे माहीत आहे. याच काळात तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी साधारण ७५० कोटींचा निधी मिळविला तर रस्त्यांच्या कामासाठी ही मोठा मोठा निधी मिळविला. स्थगिती उठल्यानंतर कामे सुरू झाली आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
या भूमिपूजन प्रसंगी लक्ष्मण कुटे, बी. आर. चकोर, निसार शेख, उबेद शेख, के, के, थोरात, इफ्तिशाम शेख, योगिता सातपुते, नदीम शेख, भास्कर शेरमाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.