Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यात काही तासांच्या अंतराने तीन वेगवेगळ्या अपघातात वेदांश रविंद्र पवार, (वय ३), योगीराज दिलीप चाकणे (वय ४१) रा. चांडगाव व तुषार लोणकर रा. श्रीगोंदा, या अशा तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
काष्टी येथे नगर- दौंड रस्त्यावर दुचाकी आणि टेम्पोच्या झालेल्या अपघातात श्रीगोंद्यातील तुषार लोणकर नावाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वांगदरी येथील रवींद्र राजेंद्र पवार हे त्यांच्या तीन वर्षाचा मुलगा वेदांश रवींद्र पवार याच्यासह दुचाकीवरून वांगदरी ते ढोकराई रस्त्याने सोमवारी (दि.८) जानेवारी रोजी जात असताना समोरून आलेल्या
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची पिन उन्मळून पडल्याने ट्रॉलीची दुचाकीला धडक बसली. या वेळी दुचाकीवर असलेला वेदांश खाली पडल्याने त्याच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्यामुळे तो गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला. या घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तर याच दिवशी म्हणजेच सोमवारी रात्री श्रीगोंदा शहरातील पेडगाव चौक येथे दुचाकीला पिकअपने समोरून जोराची धडक दिल्यामुळे योगीराज दिलीप चाकणे (वय ४१) रा. चांडगाव यांचा मृत्यू झाला.
याबाबत विलास चाकणे यांच्या फिर्यादीवरून पिकअप चालक दीपक केशव गायकवाड रा. चांडगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग चोवीस तासांच्या आत श्रीगोंदा तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.