चारचाकी वाहनाच्या धडकेत तीन जण जखमी ! नागरिकांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : चारचाकी वाहनाने मोटारसायकलस्वराला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये मोटारसायकलवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळ बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबतची माहिती अशी की, कासार पिंपळगाव येथील महेश बनकर हे पत्नी व दोन वर्षांच्या मुलीसह नगरकडून तिसगाव मार्गे कासार पिंपळगावला मोटारसायकलवरून जात होते. देवराई गावाजवळ तिसगावकडून भरधाव आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

या अपघातामध्ये महेश बनकर यांच्यासह त्यांची पत्नी व लहान मुलगी जखमी झाले आहेत. अपघातानंतर बनकर पती- पत्नी व रस्त्याच्या बाजूला पडले तर त्यांची लहान मुलगी त्यांच्या हातातून निसटून जवळच्या गवतात पडल्याने तिला कमी मार लागला.

अपघातानंतर चारचाकी वाहनचालक वाहनासह पळून जात असताना करंजी बस स्थानकावर त्याला शिवसेना उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, सुनील अकोलकर, बाळासाहेब अकोलकर, फिलीप क्षेत्रे, जहांगीर मणियार यांनी अडवून चारचाकी गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली तर जखमी बनकर यांना उपचारासाठी नगरला हलवण्यात आले.

देवराई गावापासून पुढे निंबोडीफाटा, तिसगावपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक चारचाकी वाहने व मोटारसायकलस्वार यांच्यात अपघात होत आहेत, त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe