Ahilyanagar News : म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग असाच अनुभव अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील तरुण घेत आहेत. येथील तीन तरुण मोटारसायकलवर थेट प्रयागराज यात्रा करून आले आहेत. सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे.
या कुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून मोठ्या संख्येने साधू संत तसेच सर्वसामान्य भाविक दाखल झाले आहेत. शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील तीन युवकांनी एका दुचाकीवर उत्तर प्रदेश (प्रयागराजची) यात्रा पूर्ण केली. यात्रा पूर्ण करून हे तीनही युवक हातगाव येथे आल्यानंतर त्यांचे हातगाव परिसरातून अभिनंदन होत आहे.

या युवकांनी अयोध्या, काशी व उज्जैन आदी ठिकाणी भेट दिली.रुपेश राजेंद्र भालेकर, ओंकार दिगंबर उन्मेघ व गणेश भागवत गाडे, अशी या युवकांची नावे आहेत. या तिघांनी प्रयागराजला जाण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार हे तीनही युवक शुक्रवार (दि. १५) फेब्रुवारी रोजी रात्री हातगावमधून प्रयागराजकडे रवाना झाले.
रविवार (दि. १७) रोजी रात्री ते प्रयागराजला पोहचले. पहाटे त्यांनी तेथील पवित्र स्नान केल्यानंतर ते अयोध्येला गेले. त्या ठिकाणी २ तास थांबून रात्री काशीकडे प्रयाण केले. काशी येथे आराम करून तेथून उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरारात जाण्यापूर्वी स्नान करून दर्शन घेतले व त्या ठिकाणी काही वेळ विश्रांती घेऊन आपल्या मूळ गावी हातगावाकडे निघाले. शुक्रवार (दि. २१) फेब्रुवारी रोज़ी ते घरी सुखरूप पोहचले.