Pathardi News : स्वस्तधान्य दुकानातील अनागोंदी काराभाराबाबत शहरातील आखरभाग, अष्टवाडा, चौंडेश्वरी गल्ली येथील महिलांनी आमदार मोनिका राजळे यांची साईनाथनगर येथील आमदार कार्यालय येथे भेट घेऊन स्वस्त धान्य योजनेंतर्गत कोरोना महामारीनंतर आजपर्यंत या योजनेमधून धान्य मिळाले नसल्याची व्यथा निवेदनाद्वारे मांडली.
या वेळी दिलेल्या निवेदनावर सुलोचना तरटे, मिरा तुकाराम मंचरे, सुनीता जगदीश हाडदे, मीना शेळके, मंगल मुकुंद भागवत, मीना विजय मरळीकर, लीला राजेंद्र ताटपुरकर, सुमन राजेंद्र ताटपूरकर, शीतल सुभाष कांबळे, मनोरमा भानुदास सदावर्ते, शरयू सदावर्ते, प्रतिक्षा मेघुंडे, भारती तरटे, अनिता भागवत, आशा पारखे, माया पाचंगे, संगीता पाचंगे आदींच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पाथर्डी शहरातील रहिवासी असून, गरीब कुटुंबातील मोलमजुरी करुन उदरनिर्वाह चालवणारे आहोत. आमच्याकडे उपजिवीकेचे दुसरे कुठलेही साधन नसून शासनाने सुरु केलेल्या स्वस्तधान्य योजनेंतर्गत कोरोना महामारीनंतर आजपर्यंत या योजनेमधून धान्य मिळालेले नाही.
सदर धान्याबाबत चौकशी करण्यासाठी दुकानदाराकडे गेलो असता उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. त्यामुळे शहरातील अनेक कुटुंबे स्वस्त धान्यापासून वंचित असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
सदर स्वस्तधान्य दुकानदाराची सखोल चौकशी करण्यात यावी व आम्हास न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात अनेक शिधापत्रिकाधारकांना स्वस्तधान्य दुकानावर धान्य मिळत नाही. तुमची शिधापत्रिका ऑनलाईन नोंदणी करून घ्या.
शिधापत्रिका अपडेट नाही. तुम्ही तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस धान्य घेतलेले नाही, त्यामुळे धान्य मिळणार नाही, अशी उत्तरे मिळतात. यासाठी नागरिक तहसील कार्यालयात हेलपाटे मारतात.
त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित नसतात किंवा कागदपत्र अपूर्ण आहेत, असे उत्तर मिळते. परंतु योग्य मार्गदर्शन कुठेही मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागतात. पैसा व वेळ वाया जाऊन मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. युवा नेते प्रशांत शेळके यांनी महिलांच्या वतीने आमदार राजळे यांना प्रश्न सोडविण्याचे साकडे घातले आहे. स्वस्तधान्य दुकानातील अनागोंदी कारभाराची आमदार मोनिका राजळे यांनी त्वरित दखल घेतली असून, त्यांनी याप्रकरणी तहसीलदारांना हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यात यावा, अशा सूचना दिल्या आहेत.