अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- आगामी जून पर्यंतच्या कालावधीत निर्माण होवू शकणाऱ्या संभाव्य टंचाईच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशात जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे.
प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारण्यासाठी ८ कोटी ११ लाख ७१ हजार रुपये अंदाजीत खर्च या कृती आराखड्यात निश्चित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी दिली.
पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारण्यासाठी प्रतिवर्षी शासन निर्देशानुसार जिल्हा प्रशासन पूर्वतयारी म्हणून कृती आराखडा तयार करते. ऑक्टोबर ते जून या कालावधीसाठी उपाययोजना व त्यावरील अंदाजीत खर्च निश्चित करण्यात येतो. या वर्षी जिल्हयात उच्चांकी पाऊस झाला आहे. भूजल स्तराची पातळी चांगली असल्याचे मानले जाते.
मात्र,ऊन्हाळ्याच्या कालावधीत पिण्याच्या पाण्याची टंचाई ग्रामीण क्षेत्रातील विशेषतः पठार भागातील काही गावे, वाडया, वस्त्यांना जाणवू शकते. हि शक्यता लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने आगामी ३०जूनपर्यंतच्या कालावधीसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणाचा अंदाजे ८ कोटी ११ लाख रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केला आहे.
यात संभाव्य टंचाई जाणवणाऱ्या गावे -वाड्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी खाजगी विहीरी अधिग्रहणासाठी ८६ लाख ४० हजाराची तरतूद करण्यात आली आहे.
टँकर भरण्यासाठी १७ लाख ६६ हजार, टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी ६ कोटी ३५ लाख १० हजार, नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी १६ लाख, तात्पुरत्या पुरक नळ योजनेसाठी ५३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी मान्यता दिली असून, प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे सादर केला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com