१४ फेब्रुवारी २०२५ राहुरी : तालुक्यातील एका गावात पत्नीची छेडछाड केल्याचा जाब विचारणाऱ्या पतीला आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी तसेच लोखंडी टॉमीने मारहाण केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी रात्री घडली.याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की १९ वर्षीय विवाहित तरुणी आपल्या कुटुंबासह या गावात राहते. ८ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाआठ वाजता ती घरासमोर उभी असताना आरोपी गौरव खिलारी तेथे आला.
त्याने पीडितेचा हात धरून तिला जबरदस्तीने जवळ ओढले आणि अश्लील कृत्य केले.यानंतर, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता पीडितेच्या पतीने गौरव खिलारीला या वागणुकीबाबत जाब विचारला.त्यावर आरोपीने शिवीगाळ करत ‘तुम्हाला काय करायचं ते करा’ असे उत्तर दिले. त्याच रात्री साडेनऊ वाजता पीडित दाम्पत्य घरी असताना आरोपी गौरव खिलारी आणि कैलास बोरुडे हे दोघे त्यांच्या घरी आले.

त्यांनी पती-पत्नीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी तसेच लोखंडी टामी व लाकडी काठ्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी तक्रार दिल्यास दोघांना जीव मारण्याची धमकी दिली.पीडित महिलेच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी गौरव गोरख खिलारी आणि कैलास शिवाजी बोरुडे (दोघे रा. कुरणवाडी, ता. राहुरी) या दोघांवर गुन्हा रजिस्टर क्रमांक १००/२०२५ नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ७४, ११८(१), ११५ (२), ३५१(२), ३५२ अंतर्गत मारहाण, दमदाटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस पथक करत आहे.