शहरातील प्लास्टिकचा वाढता वापर आणि कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन पालिकेच्या पथकाने व्यापारी व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा सूचना देऊनही कॅरीबॅग आणि चहाचे कागदी ग्लास सर्रास वापरण्यात येत असल्याने पालिका आरोग्य विभागाने गुरुवारी (२० फेब्रुवारी) बाजारपेठेत पाहणी करत मोठी कारवाई मोहीम राबवली. मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या आदेशानुसार, आरोग्य निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह शहरातील मुख्य बाजारपेठेत पाहणी मोहीम राबवली.
शहरात दररोज सुमारे ५ हजार कागदी ग्लास रस्त्यावर फेकले जातात. हे ग्लास उघड्यावर पडल्याने मोकाट जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.ग्लासवरील प्लास्टिक आवरण आरोग्यासाठी धोकादायक असते आणि त्यामधून कॅन्सरचा धोका वाढतो.

पोटाचे विकार, अपचन आणि इतर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. रस्त्यावर फिरणारी सुमारे २०० मोकाट जनावरे हा प्लास्टिकयुक्त कचरा खातात, त्यामुळे त्यांच्या आतड्यांना इजा होते, पोट फुगते आणि शेवटी त्यांना काहीही पचत नाही.
शासन आणि पालिकेने वारंवार व्यापाऱ्यांना प्लास्टिक कचऱ्याच्या दुष्परिणामांबाबत सूचना दिल्या असल्या तरी अनेक व्यावसायिक अजूनही याकडे दुर्लक्ष करत आहेत.
मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई
पालिकेच्या विशेष पथकाने नगर रोड, शेवगाव रोड, बाजारतळ परिसर, अजंठा चौक आणि मेन रोड परिसरात कडक निरीक्षण केले. कागदी ग्लास वापरणाऱ्या चहाविक्रेत्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईची शिफारस मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अजंठा चौकातील दोन आणि शेवगाव रस्ता चौकातील एका चहाविक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. व्यापाऱ्यांना प्लास्टिक कचऱ्याचा साठा त्वरित नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले.
पालिकेच्या पथकाने स्पष्ट इशारा दिला आहे की, तपासणीदरम्यान प्लास्टिक कचरा आढळल्यास व्यापाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. पाथर्डी पालिकेच्या पथकाने प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. तसेच, शहरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम वेगाने सुरू असून, अधिकाधिक व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई अटळ राहील.
पालिकेने दिलेल्या सूचना व्यापारी आणि विक्रेत्यांनी गांभीर्याने न घेतल्यास भविष्यात दंड आकारणीसह परवानेही रद्द होऊ शकतात. त्यामुळे कॅरीबॅग आणि कागदी ग्लासचा वापर थांबवून पर्यावरणपूरक उपाय योजण्याची गरज आहे