श्री सद्गुरू मेहेकरी विद्यालयाचा लोकसहभागातून कायापालट

Published on -

Ahmednagar News : प्रबळ इच्छा अन लोकसंघटन शक्तीपुढे काहीच अशक्य नाही असे म्हटले जाते. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नगर तालुक्यातील मेहेकरी येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री सद्गुरू माध्य. व उच्च माध्य. विद्यालय मेहेकरी हे होय. संस्थेची, प्राचार्यांची प्रबळ इच्छाशक्ती, सर्व शिक्षकांची चिकाटी अन जागरूक पालकांच्या लोकसहभागातून येथील विद्यालयाचा कायापालट झाला आहे.

आमची शाळा सर्वात अव्वल ठरेल असे विद्यार्थी सांगतायत. मेहेकरी हे गाव जिल्हाभरात नावाजलेले गाव आहे. जवळच असलेला चांदबीबी महाल अन भुईकोट किल्ला हे येथील ऐतिहासिक सौंदर्य आहे. गावातील श्री सद्गुरू माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रातही मोठी भरारी घेतली आहे. या विद्यालयात श्री. विकास गोबरे यांची प्राचार्य म्हणून संस्थेने नेमणूक केली.

त्यानंतर त्यांनी शाळेचा कायापालट करण्याचे ठरवले. त्यांच्याआधी तेथे असणारे शिक्षक उत्कृष्ठ अध्यापनासाठी प्रयत्नशील होतेच. त्यांनी देखील या निर्णयास संमती दर्शवली. त्यानंतर सुरु झाला शाळेच्या कायापालट होण्याचा प्रवास. प्राचार्य असून देखील अन रिटायरमेंटला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही प्राचार्य गोबरे सर यांनी स्वतः या कामात झोकून दिले. शिक्षक, शिक्षेकेतर सर्व कर्मचारी त्यादृष्टीने काम करू लागले.

स्थानिक नागरिक, पालक मदतीला धावले. प्राचार्यांना विचारले असता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची प्रेरणा व पालकांचा आशीर्वाद यामुळे आज विद्यालयाची ८० टक्के कामे पूर्ण झाले असून काही कामे अद्याप पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत असे त्यांनी सांगितले. आज विद्यालयात ५ वी ते १२ वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी भव्य २४ खोल्यांची दोन मजली इमारत, गुणवत्ता वाढ उपक्रम, इमारतीसमोर परिपाठाकरिता १५० ब्रास ब्लॉकचे पटांगण, सुंदर बगीचा अन कारंजे, बोटॅनिकल गार्डन, सुसज्ज लाल मातीचे मैदाने, मुलांच्या पिण्यासाठी नळ पाणीयोजना, स्वच्छता गृहे व अद्ययावत प्रयोगशाळा,ग्रंथालये, संगणक कक्ष व व्यायामशाळा, वाहनांसाठी नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था अशी अनेक कामे पूर्णत्वाकडे आली आहेत.

गांडूळखत प्रकल्प, परसबाग, स्पर्धा केंद्र, सभागृह,हेलिपॅड आदी कामे विचाराधीन आहेत. या विद्यालयात सोनेवाडी, मेहेकरी, पिंपळगाव लांडगा, पारगाव, पारेवाडी, खांडका,शहापूर आदी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आगळीवेगळी झालेली शाळा मॉडेल स्कुल बनेल यात शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe