पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सहकार मंत्री अमित शाहा यांनी त्रिभूवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले असून, या विद्यापीठामुळे सहकार क्षेत्र विस्तारण्यासाठी पाठबळ मिळेल.
विद्यापीठाच्या स्थापनेमुळे सहकारी संस्थाचा विस्तार, संशोधन आणि सहकार प्रशिक्षणाच्या संधी निर्माण होवून या चळवळीला व्यापक स्वरुप मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाहा यांनी संसदेमध्ये त्रिभूवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचा महत्वपूर्ण आणि एैतिहासिक असा निर्णय घेतला. देशातील सहकार चळवळीसाठी ही एक नवी सुरुवात असून, या चळवळीच्या माध्यमातून नव्या उद्यमशीलतेची सुरूवात आणि सहकारातून रोजगाराच्या संधी निर्माण होईल.
देशामध्ये केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. या मंत्रालयाची धुरा केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्याकडे आल्यानंतर सहकार चळवळीला नवा आयाम प्राप्त होवू लागला आहे. सहकार चळवळीच्या दृष्टीने हे मंत्रालय मोठी उपलब्धी ठरली असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सुरु असतानाच त्रिभूवन सहकार विद्यापीठाची स्थापना होणे ही सहकार चळवळीच्या दृष्टीने नवी सुरुवात आहे. सहकार चळवळीसाठी हे विद्यापीठ एक मुख्य मार्गदर्शनाचे केंद्र ठरेल.
या विद्यापीठाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील शिक्षण विस्तार, प्रशिक्षण, संशोधनाची प्रक्रीया घडणार असल्याने गावातील सेवा सहकारी सोसायट्यांपासून ते सहकारी साखर कारखानदारी पर्यंत सर्वच संस्थांना या विद्यापीठातून आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळेल असा विश्वास व्यक्त करुन,
सहकार चळवळीला पुढे नेण्यासाठी सहकारी संस्थामधून सुरू असलेल्या उपक्रमांना या विद्यापीठामुळे अधिक गती मिळेल, संस्थामधील कार्यक्षमता, प्रशासकीय रचना सुधारण्याच्या संधीही या विद्यापीठामुळे निर्माण होणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
बदलत्या काळात सहकारी संस्थाना आता प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करतानाच कार्यक्षमता सुधारण्याच्या संधीही स्विकाराव्या लागणार आहेत. यातूनच सहकारी संस्थाना प्रगतीच्या संधी निर्माण होतील.
सहकार चळवळीतील या नव्या बदलांचा स्विकार करुन सहकारातून रोजगार निर्मिती करणे या दुरदृष्टीतून स्थापन करण्यात आलेले त्रिभूवन सहकार विद्यापीठ सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारे ठरेल असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.