Ahmednagar News : नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटात सुमारे २०० फुट खोल दरीत ट्रक कोसळल्याची घटना गुरुवार, दि. २० रोजी सकाळी घडली. दैव बलवत्तर म्हणून ट्रकमधील दोघेजण वाचले आहेत.
छत्रपती संभाजीनगरकडून नगरकडे येत असलेला ट्रक (क्र. एम. एच. ५० एन १२९९ ) इमामपूर घाट चढून शेवटच्या वळणावर आला असता, चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पाठीमागे जात सुमारे २०० फुट खोल दरीत गेला.
ट्रक मधील मोहन भाऊ जाधव (वय ५२ रा. बाबरवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) व संतोष महिपती ( रा. भोर पाडळी, जि. कोल्हापूर) हे दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. ट्रकसोबत दोघेही खोलदरीत पलट्या खात गेले सुदैवाने दोघेही वाचले आहेत.
ट्रक सिल्लोड येथून कापूस गटन माल भरून कोल्हापूरकडे जात असताना इमामपूर घाटात अपघात घडला. अपघातामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.