अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- पावसाळा आता जवळपास संपला असल्याने खड्डेयुक्त झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी तसेच प्रमुख रस्त्यांवरील बंद असलेले पथदिवेही तातडीने सुरू करावेत, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक करत होते. आता यामधील एक मागणीला यश येऊ लागले आहे.
नुकतेच नगर शहरातील रस्त्यावरील खांबांवर एलईडी दिवा बसविण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीकडून येत्या आठ दिवसांत दिवे बसविण्यास प्रारंभ होणार आहे. सुमारे २५ हजार दिवे शहरात बसविण्यात येतील, अशी माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली.
महापालिकेचे सुमारे ३० हजार पथदिवे आहेत. त्यातील सुमारे २५ ते ३० टक्के दिवे कायम बंद असतात. त्याच्या देखभालीचा खर्चही मोठा असतो. याबाबत नागरिकांच्या कायम तक्रारी येतात. गेल्या अनेक दिवसांपासून नगर शहरातील अनेक खांबांवर पथदिवे नाहीत.
बल्ब खराब होणे, वायर तुटणे, दिवा फुटणे असे अनेक प्रकार घडून दिवे बंद झाले आहेत. उपनगरांमध्ये तर अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे चोऱ्यांच्या घटना घडत आहेत. याबाबत महापालिकेच्या सभांमध्ये वादळी चर्चा झाली होती.
यामुळे आता नव्याने एलईडी बसविण्यात येणार असल्याने संबंधित ठेकेदार कंपनीकडे देखभाल व दुरुस्ती आहे. त्यामुळे महापालिकेच्या खर्चात बचत होणार आहे. तसेच वीजबिलातही सुमारे १३ लाखांची बचत होणार आहे. दिवाळीपर्यंत बहुतेक भागात या दिव्यांचा लखलखाट होणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम