Ahmednagar News : राहाता तालुक्यातील वाकडी येथील संजय बाबुराव लहारे यांच्या गट नं १७ मधील तोडणीस आलेल्या तीन एकरपैकी साधारण पावणेदोन एकर ऊस विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे जळाला.
याबाबत स्थानिक सूत्रांनी सांगितले, की लहारे यांच्या तोडणीस आलेल्या ऊस क्षेत्रालगत रोहीत्र असून या ठिकाणाहून लोंबकळशाऱ्या वीज वाहक तारा आहे. या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन ठिणगी उडून ऊस पेटला असल्याचा अंदाज आहे.

या आगीत लहारे यांच्या ऊस पिकासह ठिबक सिंचनदेखील जळाले. या संपूर्ण आगीत संजय लहारे यांचे सरासरी तीन ते चार लाखाचे नुकसान झाले. वाकडी येथील कामगार तलाठी व महावितरण अधिकाऱ्यांनी सदरील ऊस पिकाच्या नुकसानीचा पंचनामा केला असून झालेल्या नुकसानीची योग्य ती भरपाई मिळावी, अशी मागणी लहारे यांनी केली आहे.
विजेच्या शॉर्ट सर्किटमुळेव वीज तारांच्या स्पर्शामुळे दरवर्षी कुठे ना कुठे उंच वाढलेला व तोडणीस आलेला ऊस जळण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. महावितरण विभागातील कर्मचारी यांनी याची दखल घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच योग्य त्या उपाययोजना कराव्यात.- आण्णासाहेब कोते, माजी ग्रामपंचायत सदस्य, वाकडी
ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातून धोकेदायक वीज प्रवाह तारा व रोहीत्र आहे. अशा शेतकऱ्यांनी वेळीच याची लेखी स्वरूपात तक्रार महावितरण विभागाकडे देऊन महावितरण कर्मचाऱ्यांना धोकादायक वीज तारांची माहिती द्यावी. जेनेकरून होणारे नुकसान टाळता येईल. -विठ्ठलराव शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना