अहमदनगर : दशक्रियेहून येताना भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : भरधाव टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव येथील शेतकरी कुटुंबातील दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गावर शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. शरद विनायक नवले (३६) व अविनाश विनायक नवले (30) असे मृतांचे नावे आहेत.

हे दोघे भाऊ त्यांच्या राहाता तालुक्यातील काकांच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. तेथून मोटारसायकलने (क्र. एमएच १७ एक्यू ८६८५) परतत असताना नेवासेवरून श्रीरामपूरकडे जिल्हा परिषद शाळांच्या प्रश्नपत्रिका घेऊन चाललेल्या टेम्पोने (क्र. एमएच १२ टीव्ही ४०९२) मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात दुचाकी लांबवर फेकली गेली. यात दोघांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती समजताच तेथील काळे वस्तीतील तरुण अरुण काळे, दीपक काळे व रावसाहेब काळे मदतीला धावले. सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश छल्लारे, संचित गिरमे, राजू तागड, ज्ञानेश्वर शिंदे, झुंबर शिंदे,

नानासाहेब काळे, प्रतीक काळे आदींनी गंभीर जखमी नवले बंधूंना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मागवली. परंतु त्यांचा मृत्यू झालेला होता.

* कुटुंबातील कर्ते गेल्याने दुःखाचा डोंगर

शरद व अविनाश दोघे नवले कुटुंबातील कर्ते पुरुष होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शरद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा तर अविनाश यांना पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe