Ahmednagar News : दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. योगेश दिलीप जाधव (वय २८ रा. मानोरी ता. राहुरी) असे मयत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी आण्णासाहेब यशवंत वाघ (वय ५३ रा. मानोरी ) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ३० ऑगस्ट रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास नगर-मनमाड रस्त्यावरील नांदगाव शिंगवे (ता. नगर) गावच्या शिवारात हा अपघात झाला आहे. योगेश जाधव हे त्यांच्याकडील दुचाकीवरून मानोरी येथून निघून ते मनमाड रस्त्याने प्रवास करत असताना नांदगाव शिंगवे शिवारात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसून अपघात झाला.
या अपघातात योगेश जाधव यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ अधिक तपास करीत आहेत.
अपघाताची दुसरी घटना बुधवारी (दि. ६) दुपारी घडली. दुचाकीला अवजड वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. विनायक विजय फल्ले (वय ३८, रा. पाटीलगल्ली, भिंगार) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
विनायक फल्ले हे त्यांच्याकडील दुचाकीवरून बुधवारी (दि. ६ ) दुपारी नगर मनमाड रस्त्याने नगरकडे येत असताना विळद घाट परिसरात त्यांच्या दुचाकीला एका अवजड वाहनाने धडक दिली.
यावेळी फल्ले हे खाली पडून अवजड वाहनाच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत फल्ले यांच्यावर रात्री भिंगार अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले असा परिवार आहे..